पिंपरी : पिंपरी व पिंपळे सौदागर या गावांना जोडणाऱ्या पवना नदीवरील समांतर पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. पुलाच्या कामाची मुदत संपून वर्ष उलटल्यानंतरही काम अपूर्णच आहे. त्यामुळे ठेकेदाराला दिवसाला पाच हजारांचा दंड आकारण्यात येत आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी कामाची पाहणी करून ठेकेदाराला एप्रिलअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याची तंबी दिली आहे.
सुमारे १०० मीटर लांबीचा आणि आठ मीटर रुंदीचा हा समांतर पूल आहे, तर तीन मीटरचा पदपथ आहे. त्यासाठी १३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जुन्या पुलावरून दिवसभर ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. सध्याचा पूल अरुंद असल्याने तेथे वारंवार वाहतूककोंडी होत आहे. नव्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तो वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा…केंद्रप्रमुखांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त…. शाळा तपासणी कशी ठरणार ‘असर’दार?
कामाची मुदत दीड वर्षाची होती. जून २०२२ ला ती संपली आहे. त्यानंतरही काम संथ गतीने सुरू असल्याने महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने ठेकेदार व्ही. एम. मोतेरे कंपनीला महागाई भाववाढ देणे बंद केले. सहा महिन्यांची मुदतवाढ देत दररोज एक हजार रुपये दंड लावला होता. आता ती मुदतही संपल्याने दररोज पाच हजार रुपये दंड लावला आहे. तरीही काम वेगात होत नसल्याने आयुक्त सिंह यांनी अधिकाऱ्यांसमवेत पुलाच्या कामाची पाहणी केली. ठेकेदाराला सक्त सूचना करीत एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याची तंबी दिली आहे.
हेही वाचा…पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणातील सहा रेकॉर्डिंग क्लिप पोलिसांच्या हाती…‘हा’ गुंड झाला गजाआड
वाहतूक नियोजन विभागाचे कार्यकारी अधिकारी बापूसाहेब गायकवाड म्हणाले की, ठेकेदाराला एप्रिल २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याचा सूचना दिल्या आहेत. कामाला गती मिळाली आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत पुलाच्या ‘स्लॅब’चे काम पूर्ण होईल.