पुणे : ‘भारतीय अभिजात संगीत ही जगातील अनन्यसाधारण आणि अतुलनीय कला आहे. त्याला जगाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करणे आवश्यक आहे. कलाकारांचे प्रयत्न, शासकीय पातळीवर उदासीनता दूर करण्याबरोबरच आर्थिक पाठबळाने अभिजात संगीताला जगाच्या मुख्य प्रवाहात मानाचे स्थान मिळवून देणे शक्य होऊ शकेल’, अशी भावना पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी शनिवारी व्यक्त केली.
कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सवा’च्या सांगता समारंभात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते पं. अजय चक्रवर्ती यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. त्या वेळी चक्रवर्ती बोलत होते. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे वरिष्ठ व्यवस्थापक सतीश कुबेर, संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते. पुणेरी पगडी, उपरणे, शाल आणि २५ हजार रुपये असे या सनामानाचे स्वरूप होते. उत्तरार्धात संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष शेखर सेन यांनी साधलेल्या संवादातून चक्रवर्ती यांचा सांगीतिक प्रवास उलगडला.
चक्रवर्ती म्हणाले, ‘मी स्वत:ला आजही संगीत क्षेत्रातील एक विद्यार्थीच समजत आहे. गेली ६८ वर्षे मी संगीत शिकत असून पुढील पिढीपर्यंत प्रवाहित करण्याचा प्रयत्न करत आहे. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या नावे मिळालेला हा सन्मान ह माझ्या दृष्टीने गुरूंचे आशीर्वादच आहेत.’
माशेलकर म्हणाले, ‘विज्ञान आणि संगीत दोन्ही गोष्टी सत्याचा शोध घेणाऱ्या आहेत. विज्ञान ब्रह्मांडातील स्पंदने समजावते तर संगीत त्या स्पदनांना भावनेचा अर्थ देते. विज्ञानात कंपनाने ऊर्जा निर्माण होते तर संगीतामध्ये त्या कंपनांनी आनंद निर्माण होतो. शास्त्र आणि कला या दोन्ही गोष्टी आपल्याला शांततेच्या सुरात नेऊन ठेवतात. पुलं हे शब्द, स्वर, विनोदाची नजाकत सांभाळत हसविणारे तसचे विचार करायला लावणारे व्यक्तिमत्त्व होते.’
गोयल, चित्राव यांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
पुलंना प्रत्यक्ष भेटलो तेव्हा माझी अवस्था देवासमोर एखाद्या पुजाऱ्याने बसावे अशी होती. शास्त्रज्ञ असलो तरी माझा असा ठाम विश्वास आहे की, देव जेव्हा फुरसतीने एखादी व्यक्ती घडवितो तेव्हा पुलंसारखे व्यक्तीत्व जन्मास येते. आजही मला निराशा आली तर मी पुलंचे साहित्य वाचतो किंवा ऐकतो. डाॅ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
