पिंपरी- चिंचवड: जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ पेक्षा अधिक पर्यटकांना जीव गमवावा लागला. यानंतर अवघ्या देशाभरात संतापाची लाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची धमकी पाकिस्तानला दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीदेखील भारतीय सैनिक घडलेल्या घटनेप्रकरणी बदला घेतील, अशी आशा व्यक्त केली आहे. प्रत्येक भारतीयांच्या मनात बदल्याच्या भावना असल्याचं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार हे चऱ्होली येथे बोलत होते. यावेळी माण (ऑनलाईन) आणि चऱ्होली ई- बस डेपोचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं.
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केला. अतिरेक्यांच्या अंदाधुंद गोळीबारात देशभरातील २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानसोबत बदल्याची भावना बोलून दाखवली जात आहे. “अतिरेक्यांनी, पाकिस्तानने आपल्या पर्यटकांवर हल्ला केला. जे घडलं आहे. त्याचा बदला आपले भारतीय सैनिक घेतील,” असा विश्वास प्रत्येक भारतीयांच्या मनात असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
अद्यापही जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटक अडकलेले आहेत. त्यांना आणण्याचं काम आम्ही करत आहोत. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटेंच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट घेणार असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहराची २०४१ मध्ये ६१ लाख लोकसंख्या होईल, असा अंदाज अजित पवारांनी व्यक्त केला आहे. आमदारांची संख्या वाढेल, असेही अजित पवार म्हणाले आहेत.