पुणे : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बीलावल भुट्टो यांनी UNSC मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ, पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा झेंडा आणि बीलावल भुट्टोचा पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ,आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात आपल्या देशाची ताकद दाखवून दिली आहे. सर्व देश आपल्या बाजूने झाले आहेत. तसेच आता आपल्या देशात जी-20 परिषद होत आहे. या सर्व गोष्टी पाहून पाकिस्तान बावचळला आहे. त्यामुळे अशा प्रकारची विधाने केली जात आहेत .आम्ही त्या विधानाचा निषेध करतो तसेच बीलावल भुट्टो यांनी जे वादग्रस्त विधान केले आहे त्याबद्दल राज्यभरात भाजपकडून आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.