पुणे : पालखी सोहळ्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली. हिरवी मिरची, गाजर या फळभाज्यांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली. मटारची आवक परराज्यातून होत असून, दर तेजीत आहेत. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून ३ ते ४ टेम्पो मटार, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातून मिळून ३ ते ४ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो लसूण, इंदूर येथून ९ ते १० टेम्पो गाजर अशी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ५५० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंग १०० ते १२५ गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ३० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ३० ते ३२ ट्रक बटाट्याची आवक झाली

कोथिंबिरेच्या दरात घट

कोथिंबिरेची आवक वाढल्याने दरात घट झाली. अन्य सर्व पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरेच्या दीड लाख जुडींची, तसेच मेथीच्या २० हजार जुडींची आवक झाली. पालेेभाज्यांचे शेकड्यातील दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर – ५०० ते १२००, मेथी – १५०० ते २५००, शेपू – १००० ते १५००, कांदापात – ८०० ते १५००, चाकवत – ६०० ते ७००, करडई -३०० ते ८००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ४०० ते ७००, मुळे – ५०० ते १२००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका – ३०० ते ७००, चवळई – ३०० ते ७००, पालक -१५०० ते २०००

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डाळिंब, पपई, चिकू, कलिंगड, खरबूज महाग

पालखी सोहळ्यामुळे फळबाजारात आवक कमी झाली आहे. फळ बाजारात डाळिंब, पपई, चिकू, कलिंगड, खरबूज या फळांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्य फळांचे दर स्थिर आहेत. घाऊक फळबाजारात मोसंबी १२ ते १५ टन, संत्री १ ते २ टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे एक ते दीड हजार गोणी, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, चिकू १०० खोकी, पेरू ३०० ते ४०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), सीताफळ २० ते ३० प्लास्टिक जाळी, तसेच केरळहून ५ ट्रक अननस अशी आवक झाली.