पुणे : गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशन यांच्या वतीने ‘पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रंगमंदिरात १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान सायंकाळी पाच ते दहा या वेळेत हा महोत्सव होणार आहे. पंडित भीमसेन जोशी यांचे नातू आणि किराणा घराण्याचे गायक विराज जोशी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक सुधाकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड, सचिव शिरीष नाईकरे, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाच्या विश्वस्त शाश्वती चव्हाण, शशी सुधांशु या वेळी उपस्थित होते. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी बासरीवादक पंडित राजेंद्र कुलकर्णी यांना ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
‘किराणा घराण्याचे गायक विराज जोशी यांच्या हस्ते शुक्रवारी (१२ सप्टेंबर) महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यांच्या गायनानंतर पंडित प्रवीण घोडखिंडी यांचे बासरीवादन आणि रॉकिनी गुप्ता यांचे गायन होईल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पंडित सुधाकर चव्हाण यांच्या गायनानंतर पंडित विजय घाटे यांचे एकल तबलावादन आणि पंडित राम देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आरती नायक यांचे गायन, कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे,’ असे चव्हाण यांनी सांगितले. महोत्सव विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहे.