पुणे : ‘धनंजय मुंडे यांनी विपश्यनेचा योग्य पर्याय निवडला आहे. त्यांना आता मन:शांती मिळेल,’ अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी पुण्यात दिली. मात्र, त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांनी पुण्यातील श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपतीचे शुक्रवारी दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह अन्य विविध आरोपांमुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्याकडील खाते राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून धनंजय मुंडे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विपश्यना केंद्रामध्ये दाखल झाल्याची चर्चा आहे.
याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘धनंजय मुंडे यांनी विपश्यनेचा योग्य पर्याय निवडला आहे. त्यांना आता मन:शांती मिळेल.’ ‘हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणेला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न झाले पाहिजेत. यासंदर्भात महिला आयोगानेही दखल घेणे आवश्यक आहे. न्याय मिळवून देण्यासंदर्भातील सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. महिलांची कोणतीही तक्रार असेल, तर ती महिला आयोगाने नाेंदवून घेतली पाहिजे.’ असे मुंडे म्हणाल्या.
‘पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यक्रम राबविण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार प्रत्येक राज्यात कार्यक्रम राबविले जात आहेत. अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाला महत्त्व देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहे.’असे मुंडे यांनी सांगितले.