खाडे यांची वर्णी लावण्याचे पंकजा यांना साकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी भाजपमध्ये अनेक वर्षे मुंडे समर्थकांचा वरचष्मा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमधील घडामोडीत विशेषत: भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर मुंडे समर्थकांना पद्धतशीरपणे डावलण्यात येत आहे. अशीच भावना असलेल्या शहर भाजपच्या एका गटाने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांना निश्चित झालेले पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्षपद मिळवून द्यावे, असे साकडे घातले. खाडे यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही पंकजा यांनी शिष्टमंडळाला दिली.

पंकजा मुंडे पुण्यात असताना खाडे यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटले. नगरसेवक माउली थोरात, बाबू नायर, केशव घोळवे, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक राजु दुर्गे, रघुनंदन घुले, आबा नागरगोजे यांच्यासह भाजपच्या इतर कार्यकर्त्यांचा या ७० जणांच्या शिष्टमंडळात समावेश होता. मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात होणारे कार्यक्रम काही कारणास्तव दोन वेळा लांबणीवर पडले. आता तीन फेब्रुवारीला या कार्यक्रमासाठी शहरात येण्याचे पंकजा यांनी या वेळी मान्य केले. राजु दुर्गे यांनी मुंडे समर्थकांवर अन्याय होत असल्याचे सांगत खाडे यांच्या प्राधिकरण अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित केला. आम्हाला काही नको. मात्र, खाडे यांना न्याय द्या, अशी विनंती त्यांनी सर्वाच्या वतीने केली. तेव्हा खाडे यांच्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी सर्वाना दिली.

पिंपरी पालिका निवडणुकीत मुंडे समर्थकांना डावलण्यात आले होते. सत्ता आल्यानंतरही त्यांना बाजूला ठेवण्यात येत असल्याची तक्रार आहे. खाडे हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. पिंपरी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी त्यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र, ती निवड जाहीर होऊ शकली नाही. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, मुंढे यांनी शेवटपर्यंत तो पदभार स्वीकारलाच नाही. त्यानंतर, मुंडे गटाने पुन्हा उचल खाल्ली. खाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावला आहे. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनीही मुख्यमंत्री घेतील, तो निर्णय मान्य असल्याची भूमिका घेतली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde visit to pune
First published on: 13-01-2018 at 03:04 IST