पुणे : इंडिगो कंपनीच्या यंत्रणेतील बिघाडाचा फटका पुणे विमानतळावरील प्रवाशांना मंगळवारी मध्यरात्री बसला. यंत्रणेतील बिघाडामुळे पुणे ते हैदराबाद विमानाचे रात्री तब्बल तीन तास उशिराने उड्डाण झाले. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

मागील काही काळात पुणे विमानतळावरील उड्डाणांना विलंब होत असल्याचे चित्र आहे. विमानतळावरील प्रवासांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्याचे टर्मिनल अपुरे पडत आहे. यातच विमानतळावर मंगळवारी इंडिगो कंपनीच्या यंत्रणेत बिघाड झाला. यंत्रणेतील बिघाडामुळे चेक इनची प्रक्रियेचा वेग मंदावला. यामुळे अनेक तास प्रवाशांना चेक इनसाठी रांगेत थांबावे लागले. अनेक प्रवाशांनी समाज माध्यमांवर आपला अनुभव मांडत विमान कंपनीच्या कारभारावर टीका केली.

हेही वाचा >>> …अन रोहित पवारांनी घेतला पार्थचा आधार! हिंजवडीतील बगाड यात्रेत दोघे एकत्र

पुणे ते हैदराबाद विमानाची वेळ रात्री १०.३० वाजता होती. चेक इन यंत्रणेतील बिघाडामुळे संतप्त प्रवाशांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनाही धारेवर धरले. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर तब्बल तीन तास विलंबाने १ वाजून २० मिनिटांनी विमानाचे उड्डाण झाले. इंडिगोकडून दिलगिरी याबद्दल इंडिगोने म्हटले आहे की, पुणे विमानतळावरील आमच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. चेक इनची प्रक्रिया संथ झाल्याने प्रवाशांना अधिका काळ रांगेत थांबावे लागले. यंत्रणेतील बिघाड दूर करण्याचे प्रयत्न आमच्या डिजिटल पथकाकडून सुरू आहेत. प्रवाशांनी दाखविलेल्या संयमाबद्दल आम्ही आभारी आहोत.