पुणे : रेल्वे मंत्रालयाकडून पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली असली, तरी स्लीपर डब्यांसह दिवसभर वेगवेगळ्या वेळांना नागपूरकडे जाणाऱ्या इतर गाड्या किफायतशीर दरांत उपलब्ध असल्याने ‘वंदे भारत’ऐवजी आमची इतर गाड्यांनाच पसंती असल्याची प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली. स्लीपर डबे नसल्याने ‘वंदे भारत’चे दर कमी करावेत, अशी मागणीही प्रवासी संघटनांनी केली.

रेल्वे प्रवासी संघाच्या हर्षा शहा म्हणाल्या, ‘पुण्यातून नागपूरला आझाद हिंद एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, गरीब रथ, हावडा, दुरांतो, अजनी, नागपूर एक्स्प्रेस अशा साधारणत: नऊ गाड्या आहेत. या गाड्या वेगवेगळ्या वेळांना उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवासी त्यांच्या सोयीनुसार नोंदणी करू शकतात. तसेच, या गाड्यांमध्ये स्लीपर वातानुकूलित डब्याचे (एसी टू टिअर) शुल्क ७०० ते २००० रुपयांदरम्यान आहेत.

‘वंदे भारत’ पुण्यातून पहाटे सहा वाजता असून, त्या एक्स्प्रेसमध्ये केवळ बसून जाण्याची (चेअर कार) सोय आहे आणि त्याचे तिकीटही २,०४० रुपये, तर ‘एक्झिक्युटिव्ह चेअर कार’साठी ३,७२५ आहे. हा संपूर्ण प्रवास वातानुकूलित असला, तरी इतर गाड्यांमधील आरामदायी प्रवासाच्या तुलनेत तिकिटांचे दर जास्त आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक आरामदायी प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे प्रवाशांच्या या प्राधान्यक्रमाचाही विचार रेल्वेने करणे अपेक्षित होते.’

‘मी गरीब रथ किंवा पुणे-अजनी एक्स्प्रेसने नेहमी नागपूरपर्यंत प्रवास करतो. गाडीची वेळ मला सोयीची आहे. आरामदायी प्रवास कमी पैशांत होतो. ‘वंदे भारत’पेक्षा पोहोचण्यास तीन तास अधिक वेळ लागत असला, तरी फार फरक पडत नाही,’ असे प्रवासी राजेश शर्मा यांनी सांगितले.

जितेंद्र कर्णिक हे प्रवासी म्हणाले, ‘मी सेवाग्राम एक्स्प्रेसने मनमाडला नऊ तासांत जात असून, वंदे भारत एक्स्प्रेस आठ तासांत मनमाडला पोहोचते. एका तासासाठी दुप्पट भाडे मोजणे शक्य नाही.’

बसचा पर्याय

पुणे-नागपूरदरम्यान खासगी प्रवासी बसने दोन हजार रुपयांचे भाडे आकारले जाते. केवळ बसून प्रवासासाठी हजार रुपये भाडे आहे. प्रवासासाठी १४ तासांचाच कालावधी लागतो. परंतु, या आरामदायी प्रवासासाठी अनेक गाड्या उपलब्ध आहेत. तुलनेत ‘वंदे भारत’ सकाळी एकदाच उपलब्ध आहे,’ असे मत काही विद्यार्थी प्रवाशांनी व्यक्त केले.

विमान प्रवास

पुणे ते नागपूर विमान प्रवासासाठी साडेचार ते सहा हजार रुपये लागतात. विमानाने पोहोचण्यास एक तास २५ मिनिटे वेळ लागतो. बोर्डिंग पास, तपासणी आदी प्रक्रियेचे दोन तास पकडले, तर एकूण पाच ते सहा तास लागतात. परंतु, जलद प्रवासासाठी हे उपयुक्त ठरते. ‘वंदे भारत’च्या एक्झिक्युटिव्ह चेअरचे शुल्क विमानाच्या तिकिटांच्या निम्मे म्हणजे साडेतीन हजारांचे असून, नागपूरला पोहोचण्यासाठी मात्र, १२ तासांचा कालावधी लागतो आहे.

इतर गाड्यांचे वेळापत्रक

रेल्वे – प्रवासाचा कालावधी – प्रवासी भाडे रुपयांत (आरामदायी-वातानुकूलित)

आझाद हिंद एक्स्प्रेस – १५ तास १५ मिनिटे – ४८५ ते १,७९५

महाराष्ट्र एक्स्प्रेस – १५ तास ५ मिनिटे – ४५५ ते १,७४५

नागपूर गरीब रथ – १५ तास ३५ मिनिटे – ४५० ते १,७६०

हावडा दुरांतो – १२ तास ५५ मिनिटे – ८७० ते १,७३६

पुणे अजनी – १३ तास ३५ मिनिटे – ४९०-१,७९५