पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून दुपारी दोनच्या नंतर ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी- चिंचवडसह पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. पवना धरण ९७ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने हा विसर्ग करण्यात येणार आहे.
पिंपरी- चिंचवड शहरासह मावळमधील काही भागांमध्ये पाणीपुरवठा करणारे पवना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. यामुळेच दुपारी दोन नंतर पवना धरणातून ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पिंपरी- चिंचवडकरांचा पुढील वर्षभराचा पाणी प्रश्न मिटलेला आहे. तरीही महानगर पालिकेकडून पिंपरी- चिंचवडकरांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळत असून पुणे जिल्ह्यात देखील घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पवना धरणातून ८०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.