पिंपरी- चिंचवड: यावर्षी मान्सून वेळेआधीच आल्याने पिंपरी- चिंचवड शहरासह मावळमध्ये पाणीपुरवठा करणारे पवना धरण पन्नास टक्के भरले आहे. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला पवना धरणात केवळ १८ टक्के भरले होते. यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. यावर्षी जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.
पवना धरण परिसरात आतापर्यंत ७७३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. या महिन्याखेरीस पवना धरण हे निम्म्याहून अधिक भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस असाच कोसळत राहिल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरण लवकर भरेल असच दिसत आहे. पवना धरण ५० टक्क्याहून अधिक भरल्यानंतरही पिंपरी- चिंचवडकरांना दिवसाआड पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाने अजूनही पाणी मिळते. यावर महानगरपालिकेने उपाययोजना करण्याचे गरजेचे आहे.
दरम्यान, मावळ परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने पर्यटनासाठी वेगवेगळ्या भागातून पर्यटक येत आहेत. पवना धरण परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी दिसत आहे. सध्या तरी पवना धरण हे ५० टक्क्याहून अधिक भरल्याने पिंपरी- चिंचवडकरांची पुढील काही महिन्यांची चिंता मिटलेली आहे.