पिंपरी पालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या पवनाथडी जत्रेचे पूर्वनियोजित पिंपरी ठिकाण बदलून सांगवीत स्थलांतरित करण्यात आले आहे. एचए कंपनीचे मैदान डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने सर्व तयारी सुरू केली असताना महिला बालकल्याण समितीने अचानक हा फेरबदल सुचवला आणि तो तडकाफडकी मान्यही करण्यात आला. लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार व स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचाराची आयतीच सोय म्हणून हा ‘पवनेचा सोहळा’ आता सांगवीत होणार आहे.
महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून पवनाथडी जत्रेचे आयोजन केले होते. जवळपास चार ते पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात ५० ते ७५ हजार नागरिक विशेषत: महिला मोठय़ा संख्येने सहभागी होतात. या निमित्ताने भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महापौर मोहिनी लांडे यांनी मागील वर्षीच ‘पवनाथडी २०१४’ चे आयोजन पिंपरीत होईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार, प्रशासनाकडून सर्व तयारी सुरू होती. मंडप उभारणीच्या निविदाही प्रसिध्द झाल्या होत्या. मात्र, बुधवारी महिला बालकल्याण समितीची बैठक झाली, त्यात पवनाथडीचे ठिकाण पिंपरीऐवजी सांगवीत करावे, असा बदल सुचवण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप व ‘नदीपल्याड’ च्या राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांनी हा आग्रह धरल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, हा बदल मान्य करण्यात आला. मावळ लोकसभेसाठी आमदार जगताप हे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार मानले जातात. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय झाल्याशिवाय लोकसभेची उमेदवारी न स्वीकारण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र, तो निर्णय झालाच तर आमदारांच्या प्रचाराची आयती सोय म्हणून पवनाथडीचे ठिकाण सांगवीत निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येते.