पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडूंना पाच वर्षांनी दत्तक योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ५८ अर्जदारांपैकी ४४ खेळाडू पात्र झाले आहेत. या खेळाडूंना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी क्रीडा विभागाच्या लेखा शिर्षातून ७४ लाख रुपयांच्या खर्चास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली. त्यानुसार खेळाडूला दोन वर्षे दरमहा सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
शहरातील खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात नाव कमवावे, शहरात नवीन खेळाडू घडावेत, त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापालिकेने सन २०१३ पासून खेळाडू दत्तक योजना राबविण्यास सुरुवात केली. या योजनेतून सन २०२० पर्यंत खेळाडूंना लाभ देण्यात आला. मात्र, सन २०२० पासून योजना बंद पडली. योजना बंद असतानाही दरवर्षी खेळाडूंकडून अर्ज मागविले जात होते. मात्र, अर्जावर पुढे काही होत नव्हते. त्यामुळे खेळाडूंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने खेळाडूंना लाभ देण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेच्या क्रीडा विभागाने २०२२-२३ या आर्थिक वर्षांसाठीचे २०२४ मध्ये अर्ज मागवले होते. त्याला ५८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी प्रतिसाद दिला. त्यांपैकी ४४ जणांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. या पात्र खेळाडूंना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. १४ जणांचे अर्ज गुणपत्रक, शिधापत्रिका नसणे आदी कारणांवरून नाकारण्यात आले.
काय आहे योजना?
महापालिका हद्दीतील किमान तीन वर्षे रहिवासी असलेल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसाठी ही दत्तक योजना आहे. महापालिका शाळा, खासगी शालेय विद्यार्थी आणि अन्य खेळाडूंना या योजनेसाठी प्रवेश आहे.
मैदानी खेळ, हॉकी, कबड्डी, कुस्ती, बॉक्सिंग, नेमबाजी, खो-खो, लॉन टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, रोलर स्केटिंग आणि क्रिकेट या खेळात शासकीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतून राष्ट्रीय शालेय, महाविद्यालयीन आणि इतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना अर्ज करता येतात. योजनेत पात्र झालेल्या खेळाडूंना पीएमपीएमएल बस प्रवास मोफत, सकस आहारासाठी भत्ता, मागणीनुसार खेळाचे साहित्य मिळते.
करोनासह विविध कारणांमुळे पाच वर्षे योजनेचा लाभ देता आला नाही. २०२२-२३ या वर्षात पात्र झालेल्या ४४ खेळाडूंना लाभ दिला जाणार आहे. एका खेळाडूला दोन वर्षे दरमहा सहा हजार रुपये दिले जाणार आहेत, असे क्रीडा विभागाचे उपआयुक्त पंकज पाटील यांनी सांगितले.