पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यातील राहटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर येथील वर्तुळाकार मार्ग आणि रेल्वे मार्गाच्या आरक्षणामध्ये घरे तोडावी लागणार असल्याने ही आरक्षणे रद्द करण्याची मागणी बाधित नागरिकांनी केली आहे. आरक्षणे रद्द न केल्यास ३० जूनपासून या परिसरात बंद पाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या मागणीसाठी बाधित नागरिकांनी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या माध्यमातून चिंचवड येथे निवारा हक्क संवाद यात्रा काढली. त्यामध्ये स्वाभिमानी घर बचाव चळवळीचे मुख्य समन्वयक धनाजी येळकर पाटील, माजी नगरसेवक राहुल कलाटे, इम्रान शेख, मनोज पाटील, देवेंद्र भदाणे, रामचंद्र ढेकळे, सतीश नारखेडे सहभागी झाले होते.‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच शहर दौऱ्यावर असताना चऱ्होली येथील नगररचना योजना (टीपी स्कीम) रद्द करण्याचे आदेश दिले.

विकास आराखड्यात रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर, बिजलीनगर येथील रहिवाशी घरावर २० मीटर वर्तुळाकर मार्ग, रेल्वे मार्ग, १५ आणि २४ मीटर रस्त्यासह विविध प्रकारची आरक्षणे टाकली आहेत. या आरक्षणाला नागरिकांचा विराेध हाेत आहे. त्यानंतरही सरकार आणि महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. मुख्यमंत्री चऱ्होलीसाठी वेगळा न्याय आणि आमच्यासाठी वेगळा न्याय देत आहेत. असे प्रश्न स्वाभिमानी घर बचाव चळवळीचे मुख्य समन्वयक येळकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रस्तावित विकास आराखडा मुख्यमंत्री रद्द करू शकतात. तर, लोकांची घरे उद्ध्वस्त करणारा विकास आराखडाही त्यांनी रद्द करावा. आराखडा रद्द न केल्यास ३० जूनपासून थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर, बिजलीनगर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.’ असे येळकर यांनी स्पष्ट केले.