जकातीच्या भरघोस उत्पन्नामुळे श्रीमंत महापालिकेचा नावलौकिक प्राप्त झालेल्या पिंपरी पालिकेच्या उत्पन्नाला एलबीटी लागू झाल्यानंतर घसरण लागली. जकात असताना वर्षांकाठी १२०० कोटींचे नियोजन करणाऱ्या महापालिकेला एलबीटीच्या ९०० कोटी इतक्याच उत्पन्नावर समाधान मानावे लागणार आहे. एलबीटीतून मिळणाऱ्या अपेक्षित उत्पन्नाचा आकडा महापालिकेने ओलांडला असला, तरी जकातीच्या तुलनेत ३०२ कोटी रुपयांची तूट मिळाल्याचे वर्षभरानंतर स्पष्ट झाले आहे.
महापालिकेकडून जकातआकारणी होत असताना २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठी १२०० कोटींचे वार्षिक उत्पन्न गृहीत धरण्यात आले होते. प्रत्यक्षात, राजशासनाने एक एप्रिल २०१४ पासून एलबीटी लागू केला. त्यानंतरच्या परिस्थितीत सर्व गोष्टींचा विचार करून १२०० कोटींचे वार्षिक उद्दिष्ट कमी करून ९०० कोटी करण्यात आले. काही कालावधीनंतर तेही सुधारित स्वरूपात ८९० कोटींपर्यंत कमी करण्यात आले. विविध अडथळे पार पाडत वर्षभरानंतर उत्पन्नाचे हे उद्दिष्टय़ ओलांडण्यात महापालिकेला यश आल्याचा युक्तिवाद एलबीटी विभागाचे प्रमुख यशवंत माने यांनी केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०२ कोटींनी उत्पन्न कमी आल्याचे मान्य करतानाच एलबीटीचे निर्धारित उत्पन्नापेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यात यश आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. औद्योगिक मंदीचा काळ, एलबीटीचे कमी असलेले दर आणि एलबीटीची व्यवस्था बसवण्यात गेलेला कालावधी यामुळे काही प्रमाणात उत्पन्न कमी झाले. तथापि, आगामी काळात हळूहळू सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सुरुवातीला एलबीटी भरण्यास व्यापारी व नागरिकांचा विरोध नंतर हळहूळू मावळला. दुसरीकडे, पालिकेने कठोर पावित्रा घेतला आणि एलबीटी न भरणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या, त्यांचे खुलासे मागवले गेले. कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला. अशा उपाययोजनांचा लाभ झाला. व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यास सुरुवात केली आणि पालिकेच्या उत्पन्नात भर पडू लागली.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2014 रोजी प्रकाशित
पिंपरी पालिकेला जकातीच्या तुलनेत ३०२ कोटींची तूट
एलबीटीतून मिळणाऱ्या अपेक्षित उत्पन्नाचा आकडा महापालिकेने ओलांडला असला, तरी जकातीच्या तुलनेत ३०२ कोटी रुपयांची तूट मिळाल्याचे वर्षभरानंतर स्पष्ट झाले आहे.
First published on: 02-04-2014 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc lbt income deficit