पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण केले आहे. सामाजिक दायित्व निधीतून शाळा चालविणाऱ्या ‘आकांक्षा फाउंडेशन’ या संस्थेला या सहा शाळा पाच वर्षांसाठी चालविण्याकरिता देण्यात येणार आहेत. त्यासाठी ४० काेटी ५३ लाख ७५ हजार रुपये या संस्थेला दिले जाणार आहेत.
महापालिकेतर्फे बालवाडी ते आठवीपर्यंतच्या मराठी, इंग्रजी, उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या १०५ शाळा चालवल्या जातात. मागील अकरा वर्षांपासून ‘आकांक्षा फाउंडेशन’च्या माध्यमातून पाच प्राथमिक शाळा चालवल्या जात आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा सुधारल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. महापालिका शाळांमध्ये गरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ‘आकांक्षा फाउंडेशन’ने कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) माध्यमातून प्रायाेगिक तत्वावर महापालिकेच्या पाच शाळा चालवण्यासाठी मागील अकरा वर्षांपूर्वी घेतल्या हाेत्या. या शाळेचा सर्व खर्च कंपन्यांमधून मिळणाऱ्या सीएसआरमधून केला जात हाेता. मात्र, सीएसआर निधीतून खर्च भागविणे शक्य हाेत नसल्याचे ‘आकांक्षा फाउंडेशन’ने महापालिकेला कळविले.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने दहा जून राेजी सहा शाळा चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. सहा शाळांमधील ३ हजार ४५० विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी वार्षिक खर्च ४७ हजार १२१ गृहित धरण्यात आला. त्यानुसार एका वर्षांचा १६ काेटी २५ लाख ६७ हजार ४५० रुपये प्रमाणे पाच वर्षांसाठी ८२ काेटींची निविदा प्रसिद्ध केली हाेती. या निविदेला दाेन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही आकांक्षा फाउंडेशनची एकमेव निविदा आली आणि तीच पात्र झाली. या संस्थेने प्रति विद्यार्थी वार्षिक खर्च २७ हजार रूपये दर करून पाच वर्षांचा ४६ काेटी ५७ लाख खर्च हाेईल, अशी निविदा सादर केली. मात्र, शिक्षण विभागाने दर कमी करण्यासाठी ‘आकांक्षा’कडे विचारणा केली. या संस्थेने प्रति विद्यार्थी वार्षिक खर्च २३ हजार ५०० रुपये सुधारित दर दिला. आठ काेटी दहा लाख ७५ हजार रुपये एका वर्षांचा खर्च गृहित धरण्यात आला. त्यानुसार ‘आकांक्षा फाउंडेशन’ला सहा शाळा चालवण्यासाठी पाच वर्षांकरिता ४० काेटी ५३ लाख ७५ हजार रुपये देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
या शाळांचा समावेश
श्रीमती अनुसया नामदेव वाघेरे शाळा पिंपरी, छत्रपती शाहू महाराज शाळा कासारवाडी, कै. दत्ताेबा रामचंद्र काळे शाळा काळेवाडी, पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा बाेपखेल, सावित्रीबाई फुले शाळा माेशी आणि दिघीतील पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा ‘आकांक्षा फाउंडेशन’च्या माध्यमातून चालविल्या जाणार आहेत.
‘आकांक्षा फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘सीएसआर’ निधीतून पाच प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविल्या जात हाेत्या. मात्र, ‘सीएसआर’ निधी कमी पडत असल्याने यावर्षी प्रथमच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार सहा शाळा चालविण्यासाठी पाच वर्षांला ४० काेटी ५३ लाख रुपये ‘आकांशा फाउंडेशन’ला देण्यात येणार आहेत. – संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.