पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी पवना नदीवरील रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याच्या महापालिकेच्या मागणीला जलसंपदा विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नवीन बंधारा उभारणीस ९० कोटी रुपयांचा खर्च असून, तो देण्याची मागणी जलसंपदा विभागाने महापालिकेकडे केली आहे.

गेट असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या बंधाऱ्यामुळे तीन दिवस पुरेल इतका जलसाठा उपलब्ध राहील, असा महापालिकेचा दावा आहे. पवना धरणातून सोडलेले पाणी रावेत बंधाऱ्यावरून उचलले जाते. हा बंधारा जुना असून, जीर्ण झाला आहे. महापालिका येथून ५२० दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध जलउपसा करते. निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथे पाणी शुद्ध करून शहराला वितरित केले जाते. रावेत बंधाऱ्यास गेट नसल्याने गाळ, घाण, जलपर्णी, तसेच औद्योगिक कचरा व सांडपाणी तेथेच साचून राहते. दुर्गंधीही निर्माण होते. बंधाऱ्याच्या परिसरात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा साचला आहे.

गाळ न काढल्याने पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. एक दिवस पुरेल इतके पाणी साठते. तांत्रिक बिघाड झाल्यास, उशिराने पाणी आल्यास पाणीपुरवठा विभागाचे नियोजन कोलमडते. अधिकचा पाणीसाठा राहावा, यासाठी नवीन बंधारा बांधण्याची मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली होती. जलसंपदा विभागाने नवीन बंधाऱ्याचे चार प्रकारचे डिझाइन तयार केले आहे. त्यापैकी एका डिझाइनला सहमती द्यावी, बंधारा उभारणीसाठी ९० कोटी रुपयांचा खर्च द्यावा, असे पत्र जलसंपदा विभागाने नुकतेच महापालिकेला दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात

मुळा-मुठा नदीवर पुण्यातील बंडगार्डन येथे गेट असलेला अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बंधारा आहे. त्याप्रमाणे बंधारा बांधण्यास महापालिकेने तत्त्वतः सहमती दिली आहे. नवीन बंधाऱ्यामुळे तीन दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध राहील. बंधाऱ्यास गेट असल्याने गाळ व कचरा वाहून जाऊन नदी स्वच्छ राहण्यास मदत होईल. महापालिकेने रक्कम दिल्यानंतर आणि पावसाळा संपल्यानंतर जलसंपदा विभागाकडून प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.

जलसंपदा विभागाकडून रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याबाबत पत्र आले आहे. त्यासाठी ९० कोटी रुपयांची मागणी केली आहे. आयुक्तांची मंजुरी घेऊन जलसंपदा विभागाला कळविले जाईल. बंधारा झाल्यानंतर शहराला तीन दिवस पुरेल इतका पाणीसाठा रावेत येथे उपलब्ध होईल. – अजय सूर्यवंशी, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.