लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: श्वान परवान्यासाठी महापालिकेने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली असून गेल्या नऊ महिन्यात ६७१ श्वान मालकांनी श्वानासाठी ऑनलाइन अर्ज करून परवाना घेतला आहे. परवाना न घेता श्वान पाळल्यास संबंधित श्वान मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाने दिला आहे.
महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचे सुलभीकरण करून त्या जलदगतीने नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविला आहे. ऑनलाइन पद्धतीने विविध सेवा देण्याकडे महापालिकेचा कल असून नागरिकांच्या वेळेत बचत व्हावी, या उद्देशाने या सेवा परिणामकारक ठरत आहे. महापालिकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत पाळीव प्राण्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी डॉग शेल्टर सुरू केले आहेत.
आणखी वाचा-असुरक्षित तळेगाव दाभाडे : आता वडगाव मावळमध्ये खून
परवाना प्राप्त केल्याशिवाय श्वान पाळू नये, असा शासन नियम आहे. त्यानुसार महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागामार्फत श्वान मालकास श्वान परवाना दिला जातो. यामध्ये श्वान मालकास प्रत्यक्ष कार्यालयात येऊन संपूर्ण प्रक्रिया करून घ्यावी लागते. त्यामुळे अनेक श्वान मालक अधिकृत परवाना घेत नव्हते. याचाच विचार करून महापालिकेने हद्दीतील नागरिक आणि पाळीव प्राणी मालक यांना ४ ऑगस्ट २०२२ पासून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन श्वान परवाना उपलब्ध करून दिला आहे. गेल्या नऊ महिन्यात ६७१ नागरिकांनी श्वानासाठी ऑनलाइन अर्ज करून परवाना घेतला आहे.
शहरात श्वान पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. श्वान परवाना ऑनलाइन केल्यामुळे अनेक श्वान मालक परवाना घेत आहेत. ऑनलाइन परवान्याची मुदत परवाना प्राप्त झाल्यापासून एक वर्षापुरती असणार आहे. दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक राहील. श्वानास रेबीज लसीकरण करणे बंधनकारक आहे. परवाना धारकाने सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर श्वानास मोकळे सोडता कामा नये. कोणत्याही व्यक्तीने परवाना प्राप्त केल्याशिवाय श्वान पाळू नये. परवाना घेतला असेल आणि त्याचे नूतनीकरण केले नसल्यास विना परवाना श्वान पाळला आहे असे समजण्यात येऊन दंडात्मक कारवाई करण्यात येईल. -संदीप खोत, उपायुक्त, पशु वैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका