लोकसत्ता वार्ताहर

नारायणगाव : सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आता आर्थिक मदत देण्यात येणार आहे. केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्रप्रकाश गोयल यांनी सर्पदंशावरील उपाययोजनांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दिले आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात पुढाकार घेत सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.  

जुन्नर तालुक्यातील घोणस सर्पदंशाचे वाढते प्रमाण ध्यानात घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव आणि केंद्रीय वनविभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल याची भेट घेतली होती. कर्नाटक, ओडिशा, पंजाब, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांमध्ये सर्पदंशामुळे मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाते, याकडे कोल्हे यांनी लक्ष वेधले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सर्पदंश झालेल्या व्यक्तींना  आर्थिक मदत देण्याची आणि यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

आणखी वाचा-पिंपरी : वायसीएमच्या डॉक्टरला मारहाण, तरुणावर गुन्हा

केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी तातडीने लक्ष घालून सर्पदंशापासून स्थानिक ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याच्या आणि सर्पदंश झालेल्या स्थानिक ग्रामस्थांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. जी. टेंभुर्णीकर यांना पत्राद्वारे दिले. ही तातडीने कार्यवाही केल्याबद्दल कोल्हे यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव आणि महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांचे आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील आमदारांनी आता सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारला त्वरीत कार्यवाही करण्यास भाग पाडावे. तसेच राज्य सरकारनेही सर्पदंशामुळे मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत तसेच वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत यासाठी तातडीने पावले उचलावीत. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यात स्नेक बाईट केंद्र सुरु करण्याचा गांभीर्याने विचार करावा. -डॉ. अमोल कोल्हे, खासदार