पिंपरी : शाश्वत नागरी वाहतुकीसाठीचे महत्त्वाचे पाऊल ठरू शकणारी ‘१५ मिनिटांत शहर’ ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर निगडी प्राधिकरणातील एका मार्गावर राबविण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवात केली. शहराच्या हरित सेतू उपक्रमातील या पथदर्शी प्रकल्पात नागरिकांना सुरक्षित, पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि जलद वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर असून, रस्ते अधिक सर्वसमावेशक करण्यावर भर आहे.

‘१५ मिनिटांत शहर’ या संकल्पनेत नागरिकांना ते राहत असलेल्या ठिकाणापासून चालत, सायकलवरून किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे शाळा, बाजारपेठा, कार्यालये, दवाखाने, उद्याने, मनोरंजन केंद्रे आदी गरजेच्या ठिकाणी १५ मिनिटांत पोहोचता येण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध असाव्यात, असे अपेक्षित आहे. याचा एक भाग म्हणून निगडी प्राधिकरणातील १०० मीटर मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर चालणे, सायकलिंग आणि पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन अशा सुविधांचे एकात्मिक प्रारूप तयार केले गेले आहे. या मार्गावरील एकही झाड न तोडता आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन ही लोककेंद्री शहरी विकास संकल्पना अमलात आणली गेली आहे. गल्ल्यांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, सायकल मार्ग, पदपथ विकसित केले जाणार आहेत. सावली देणाऱ्या झाडांची लागवड करून काही ठिकाणी छत आच्छादने लावली जाणार आहेत. वाहनतळाची व्यवस्था केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह्जच्या तज्ज्ञ प्रतिनिधी मंडळाने या भागाला भेट दिली. संस्थेचे स्काय डंकेन यांनी या प्रकल्पाची प्रशंसा केली. प्रकल्प संरचना प्रसन्न देसाई यांची असून, आशिक जैन यांनी सहकार्य केले आहे. प्रकल्प व्यवस्थापन पॅव्हटेक डिझाइन कन्सल्टंट्सचे, तर बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी अंमलबजावणी करणार आहे.

पादचारी, सायकलस्वार आणि सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिकेने हरित सेतू प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात निगडी प्राधिकरणात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पाच चौरस किलोमीटर क्षेत्रात २०.२० किलोमीटर लांबीचे काँक्रीटचे रस्ते करण्यात येणार आहेत. दोन्ही बाजूंना दोन मीटरचे पदपथ, १.८ मीटरचे सायकल मार्ग आणि दोन मीटरचे समांतर वाहनतळ तयार केले जाणार आहेत. त्याद्वारे ‘१५ मिनिटांत शहर’ संकल्पना अमलात आणण्याचे उद्दिष्ट आहे.

हरित सेतू उपक्रमाच्या माध्यमातून शहरात सुरक्षित, निरोगी, सर्व वयोगटातील नागरिकांसाठी समावेशक रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक सुलभ, सुरक्षित आणि सुयोग्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ‘कनेक्टिव्हिटी’ सुनिश्चित करण्यात येणार आहे.बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, दळणवळण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका