पिंपरी : बाणेरमधून कोरियन नागरिकाचा मोबाइल हिसकावणाऱ्या तिघा चोरट्यांना चिखली पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व चोरीचे दोन मोबाइल असा एक लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, मोबाइल चोरीनंतर आरोपींनी दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेले होते.
दिगंबर सुनील साळुंके (वय २०, रा. वैष्णवी ओरान्स, जाधववाडी, चिखली), विशाल प्रभाकर समुखराव (वय १९, रा. म्हाळंग्रा, ता. चाकुर, जि. लातूर), विशाल राजू कांबळे (वय १९, रा. पायगुडेनगर, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पार्क सुंग हो (वय ४५, रा. बालेवाडी, मूळ – रिपब्लिक ऑफ कोरिया) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोबाइल चोरीनंतर अल्पवयीन मुलींना पळवले
परदेशी नागरिकाचा मोबाइल हिसकावण्याच्या गुन्ह्यात असणाऱ्या विशाल समुखराव आणि विशाल कांबळे या दोघांनी १७ मे रोजी परदेशी नागरिकाचा मोबाइल हिसकावल्यानंतर १९ मे रोजी दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेले. अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी स्वतंत्रपणे दाखल केली होती. दोन्ही मुली मैत्रिणी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना एकत्र फूस लावून पळवून नेल्याचा संशय बळावला होता. पोलीस पथकाने संबंधित अल्पवयीन मुली आणि आरोपी हे वाशीम येथे असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार सहायक निरीक्षक लक्ष्मण मोगले यांच्या पथकाने २७ मे रोजी वाशीम येथून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका केली.