पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने एक लाखांपुढील थकबाकी असलेल्या मालमत्तांवर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार २७ व्यावसायिकांच्या मालमत्ता लाखबंद (सील) केल्या आहेत. नळजोडही खंडित केले जात आहेत. थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. कारवाई तीव्र केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, माेकळ्या जमिनी, औद्याेगिक आणि मिश्र अशा सात लाख ३५ हजार नाेंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत कराची वसुली केली जाते. या विभागाला २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात एक हजार ५० काेटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पहिल्या सहामाहीत विभागाने ६०० काेटींचा कर वसूल केला आहे. उर्वरित सहा महिन्यांत ४५० काेटींचा कर वसूल करण्याचे आव्हान या विभागापुढे असणार आहे. आगामी काळात महापालिकेची निवडणूक हाेणार आहे. आचारसंहितेमध्ये दीड महिना जाण्याची शक्यता असून या कालावधीत कर वसुली माेहीम थंडावेल. त्यामुळे कर आकारणी व कर संकलन विभागाच्या १८ विभागीय कार्यालयांतील सर्व गटप्रमुखांना थकबाकीदारांच्या मालमत्ता लाखबंद करणे, पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात व्यावसायिक मालमत्ता लाखबंद करण्यास सुरुवात केली आहे. शहरात एक लाखांपुढे थकबाकी असलेल्या आठ हजार मालमत्ता असून या सर्व मालमत्ताधारकांना नाेटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यांपैकी आतापर्यंत २७ मालमत्ता लाखबंद केल्या आहेत. काही मालमत्तांचे नळजाेडही खंडित करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान १२५ थकबाकीदारांनी तत्काळ कराचा भरणा केला आहे.
थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत कोणत्याही प्रकारची शिथिलता ठेवली जाणार नाही. मालमत्ता कर थकबाकीदारारांवर मालमत्ता लाखबंद, नळजोड खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. नागरिकांनी थकबाकीचा भरणा करून कारवाई टाळावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी केले.
थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊनही कर भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे मालमत्ता लाखबंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. एक लाखापुढील थकबाकी असलेल्या मालमत्ता लाखबंद केल्या जात आहेत, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.