पिंपरी -चिंचवड: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आठ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण ३९ आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याच्या हेतूने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे ठोस पाऊल उचलत आहेत. सध्या पिंपरी- चिंचवडमध्ये ‘चौबे पॅटर्न’ बघायला मिळत असून गुन्हेगारांना हद्दपार करण्याचं काम सध्या पोलीस आयुक्त करताना दिसत आहेत.

आगामी लोकसभा निवडणूका भयमुक्त आणि नि:पक्षपाती पार पडाव्यात यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी २०२४ मध्ये आजतागायत आठ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण ४० आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. निवडणुका आल्या की गुन्हेगारी टोळ्या सक्रिय होतात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतं.

हेही वाचा : श्रीरंग बारणे यांच्या अडचणी वाढल्या, चिंचवडमधून भाजपाचा विरोध कायम

अनेक गुंड हे स्थानिक नेत्यांनी पोसल्याचं देखील बघायला मिळतं. यामुळे अशा गुंडांवर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी वचक राहावा यासाठी गेल्या तीन महिन्यांत ३९ आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. विनय कुमार चौबे यांनी पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यापासून मोक्का पॅटर्न राबवला जात आहे. विनयकुमार चौबे यांनी आत्तापर्यंत ३९६ आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली.