पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मिळतकराची देयके वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. बचत गटातील महिलांच्या माध्यमातून घरोघरी देयकांचे वितरण करण्यात येत असून, ३१ मेपर्यंत देयके वितरणाचे काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. ३० जूनपर्यंत ऑनलाइन भरणा केल्यास करात दहा टक्के सवलत दिली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख १५ हजार ८६३ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. महिला बचत गटाकडून देयके घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी महापालिकेने महिला आर्थिक विकास महामंडळावर सोपवली आहे. देयके वाटप करण्यात येणाऱ्या महिलांना महापालिकेच्या वतीने ओळखपत्र देण्यात आले आहे. सर्व देयकांचे वितरण ३१ मेपर्यंत करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाला एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विभागाने नियोजन सुरू केले आहे.
चौकट

ऑनलाइन करभरणा करण्याची सुविधा

महापालिकेच्या वतीने आर्थिक वर्ष २०२५-२६ ची मिळकतकर देयके ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहेत. नागरिकांना ही देयके महापालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर भरता येतील. मिळकतकर देयक ३० जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पूर्ण भरल्यास सामान्य करावर दहा टक्के सवलत मिळणार आहे. महिलांच्या नावावर असलेल्या निवासी मालमत्तेवर सामान्य करात ३० टक्के, अपंगांना ५० टक्के व माजी सैनिकांना मिळकतकरात शंभर टक्के अशा सवलती कायम आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण कर ३० जून २०२५ पर्यंत भरल्यास मिळकतधारकांना विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे.
प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका