पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उद्या, शनिवारी (१८ ऑक्टोबर) पहाटे सहा वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे ‘दीपगंध सुरांचा-सुरांच्या सुवासात उजळलेली दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. यात कोमल कृष्णा, राजेश्वरी, विनय देशमुख, गणेश मोरे गायन करतील. नितीन खंडागळे, सुबोध जैन, दीपक काळे, श्याम चंदनशिवे, सागर घोडके ही मंडळी वादक असतील, अशी माहिती क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी दिली.
अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, की प्रशासनाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमधून शहरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या माध्यमातून ‘दिवाळी पहाट’सारख्या उपक्रमांद्वारे संस्कृतीचे जतन, कलावंतांना प्रोत्साहन आणि नागरिकांमध्ये सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. संगीत, नृत्य आणि कला यांचा सुंदर संगम अनुभवण्याची ही एक खास संधी ठरणार आहे.
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
दिवाळीत घराचीच नव्हे, तर शहराचीही स्वच्छता राखावी. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी. खेळणी, कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर अशा वस्तू रस्त्यावर टाकल्याने शहराचे सौंदर्य बाधित होते. कचऱ्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे या वस्तू आपापल्या प्रभागांतील ‘कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुन:प्रक्रिया करा’ (रीड्यूस-रीयुज-रीसायकल) केंद्रात जमा करण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले.
फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि ऐक्याचा सण असून, या काळात नागरिकांची दिवाळी आनंददायी, सुरक्षित आणि सुखकर व्हावी तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. दिवाळी काळात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि अग्निशमन यंत्रणा सतर्क ठेवावी, वाहतुकीची योग्य व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि अपघात प्रतिबंधक उपाय तत्परतेने राबवावेत, गर्दीच्या भागांत वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक पथके नेमावीत, असे निर्देश पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आयुक्त यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी शहरवासियांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळीसाठी शुभेच्छाही दिल्या.