पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरी, कामगार नगरी, मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डे झाले आहेत. अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. अवघ्या आठ दिवसांत ५८२ खड्डे आढळले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक संथ होऊन कोंडीत भर पडत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात १२ फुटांपासून ८० फूट रुंदीचे रस्ते आहेत. शहरात पक्के, कच्चे असे दोन हजार ७३ किलोमीटर अंतराचे डांबरी, तसेच काँक्रीट रस्ते आहेत. यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली. जूनमध्येही चांगला पाऊस झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही संततधार सुरू होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले. पिंपरी, चिंचवड, निगडी, रावेत, स्पाइन रोड, मोशी, भोसरी, नवी सांगवी, जुनी सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, चिखली, आकुर्डी परिसरात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पुनावळे, ताथवडे, वाकड भागातून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे.
गेल्या आठ दिवसांत शहरात ५८२ खड्डे आढळले आहेत. आतापर्यंत दोन हजार ५१७ खड्डे आढळले आहेत. त्यांपैकी महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने ७८४, बीबीएमने ८२, खडीने ५६९, पेव्हिंग ब्लॉकने ३६, काँक्रीटने २४९ असे १७१३ खड्डे पूर्णतः बुजविले आहेत. त्याचे प्रमाण ६८.०६ टक्के आहे. शहरातील केवळ ८०४ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
निगडी ते आकुर्डी सेवा रस्ता धोकादायक
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एकीकडे मेट्रो आणि दुसरीकडे जलवाहिनीच्या कामांमुळे दोन्ही बाजूंनी सेवा रस्त्याची खोदाई सुरू आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग पूर्णत: बंद असून, रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. त्यातच जड वाहतुकीमुळे निगडी ते आकुर्डी या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तो अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यातच पवळे पूल आणि आकुर्डीतील खंडोबा चौकात रिक्षा थांबत असल्याने वाहतुकीला अडथळा येत आहे. खड्डे, धूळ, वाहतूककोंडी आणि अपूर्ण कामामुळे येथे दररोजच छोटे-छोटे अपघात होतात. त्यातून हमरीतुमरी आणि वाहतूक संथ होणे नित्याचे बनले आहे. या भागात विद्यार्थ्यांना, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.
खडीमुळे अपघाताचा धोका
खड्ड्यांमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे चालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही. वाहन खड्ड्यात आदळून चालक आणि वाहन दोघांना दणका बसतो. खड्ड्यांतून सुट्या झालेल्या खडीवर दुचाकी घसरून अपघात होत आहेत. खड्ड्यांपासून बचावासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
अभियंत्यांना देणार समज
खड्ड्यांकडे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आणि खड्डे बुजविताना दर्जा न ठेवल्याप्रकरणी महापालिकेच्या २६ कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांनी सादर केलेल्या खुलाशाची पडताळणी सुरू असून, त्यांना समज देण्यात येणार असल्याचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पाठदुखीचा त्रास वाढला आहे. महापालिका आणि मेट्रो प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. निगडी ते आकुर्डी रस्त्याची दुरुस्ती करावी. शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत. – अभिजित खैरे, चिखली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
पावसाळापूर्व कामे उन्हाळ्यातच केली होती. शहरातील खड्ड्यांची माहिती घेऊन ते तातडीने बुजविले जातात. रस्त्यावर पाणी साचल्यास, खड्डा आढळला, की तातडीने बुजविला जातो. – देवन्ना गट्टूवार, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.