पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्रावणी टोनगे हिची निवड जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (यूडब्ल्यूसी) संस्थेच्या रॉबर्ट बॉश महाविद्यालयामध्ये झाली आहे. २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात श्रावणीचा प्रवेश निश्चित झाला आहे. शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळवणारी ती महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी असल्याचे महापालिकेने सांगितले.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी श्रावणी हिने महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. श्रावणी आता अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी जर्मनीला चालली आहे. या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात ती विज्ञान, गणित, अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करणार आहे. जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज या संस्थेच्या रॉबर्ट बॉश कॉलेजेस या संस्थेमार्फत शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातून तिची निवड करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेत तिला ९३ टक्के गुण मिळाले आहेत. तिचे वडील खासगी शाळेत शिक्षक आहेत, तर आई खासगी कंपनीत नोकरी करत आहे. २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात श्रावणीचा शिक्षण प्रवास जर्मनी येथून सुरू होणार आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजेस या संस्थेची जगभरात विविध ठिकाणी शाळा व महाविद्यालये आहेत. संस्थेमार्फत शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात.
श्रावणीने अनेक शैक्षणिक आणि सहशालेय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तिने शिष्यवृत्ती परीक्षा तसेच हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा देखील यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. क्रीडा क्षेत्रातही शाळेच्या बास्केटबॉल संघाची ती कर्णधार होती आणि डिस्कस थ्रो या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. शिष्यवृत्तीसाठी विविध टप्प्यांवर परीक्षा, चर्चा, मुलाखत आणि उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. श्रावणीच्या नेतृत्वगुणांना, सामाजिक जाणिवेला आणि शैक्षणिक समतेला या निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले गेले. श्रावणीची निवड झाल्यामुळे हे संपूर्ण शहरासाठी आणि महापालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण आहे. श्रावणीने आपली गुणवत्ता, जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. केंद्रित शिक्षण पद्धती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा तिच्या यशात असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, आत्मविश्वास आणि जागतिक स्तरावर चमकण्याची क्षमता आहे, हे श्रावणीने सिद्ध करून दाखवले. तिचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे, संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे, असे शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सांगितले.
मला महापालिकेच्या शाळेत केवळ शिक्षणच नाही, तर स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या यशामध्ये शिक्षकांचे सततचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि शाळेच्या वातावरणाचा मोठा वाटा आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिकण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी आयुष्य बदलणारे आहे, असे विद्यार्थिनी श्रावणी टोणगे म्हणाली.