पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) दिवसभर जोरदार पाऊस झाला. यामुळे चिखली घरकुल वसाहत, रुपीनगर, दापोडी, आकुर्डी भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. भूमकर चौकासह शहरातील विविध ठिकाणच्या भुयारी मार्गासह सखल भागात पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाण्याचा उपसा केला. काही ठिकाणी सोसायट्यांनाच पाण्याचा उपसा करावा लागला. संततधारेमुळे आळंदीतील इंद्रायणी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून, पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी दिवसभर पाऊस कोसळला. रात्रीही पावसाची रिमझिम सुरू होती. मंगळवारी सकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला. दिवसभर पाऊस कोसळत होता. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी, सांगवी, ताथवडे, मामुर्डी, वाकड, पिंपळेगुरव, पिंपळेनिलख परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यामुळे काही भागांत वाहतूक कोंडी झाली होती. पुणे-बंगळुरू महामार्गावर ताथवडे सेवा रस्त्यावर, भूमकर चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. निगडीतील टिळक चौकाला तळ्याचे स्वरूप आले होते. केजूबाई बंधारा येथे महावितरणच्या वायरवर झाड पडले होते. अग्निशमन पथकाने तत्काळ हे झाड बाजूला काढले.

याबाबत महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, ‘शहरातील अनेक भागांतील सोसायट्यांमधून पाणी शिरल्याच्या तक्रारी आल्या होत्या. चिखली, घरकुल, दापोडी, आकुर्डी, रुपीनगर येथे महापालिकेच्या पथकाने जाऊन पंपाद्वारे पाणी उपसले आहे. काही सोसायटीधारकांनी स्वत: पंप लाऊन पाणी काढले आहे. मोठे पंप सज्ज ठेवले आहेत.’

क्षेत्रीय कार्यालनिहाय नियंत्रण कक्ष

महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. आठही क्षेत्रीय कार्यालयांत नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहेत. जलद प्रतिसाद पथके कार्यरत केली आहेत. त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, आरोग्य, विद्युत, स्थापत्य, उद्यान अशा विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकांच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना केल्या जात असल्याचे महापालिकेने सांगितले.

आळंदीत इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ

जोरदार पावसामुळे आळंदीतील इंद्रायणी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. पुंडलिक मंदिरात पाणी शिरले आहे. पुराचे पाणी भक्ती सोपान पुलावरून वाहत आहे. नदीकाठच्या दगडी घाटावर पाणी वाहत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी चोवीस तास तैनात केले आहेत. नागरिकांनी पाण्यात उतरू नये, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने पाणी साचण्याच्या तक्रारींचे प्रमाणही अधिक आहे. महापालिकेचे पथक पाठवून पाण्याचा निचरा केला जात आहे. नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहेत. अग्निशन, उद्यान विभागाचेही पथक कार्यरत आहेत. – चंद्रकांत इंदलकर, सह आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका