पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय पद्धतीने होणार असून, प्रशासनाने प्रभाग रचनेची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची २०१७ ची प्रभाग रचना तयार असून, त्यात किरकोळ बदल केले जाण्याची शक्यता आहे. ते बदल वगळता प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच राहील, अशी माहिती निवडणूक विभागाकडून सांगण्यात आली. एका प्रभागात किमान ४९ ते कमाल ५९ हजार लाेकसंख्या असणार आहे. प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे.
राज्य शासनाने मंगळवारी प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानंतर महापालिकेचा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी तयारीची माहिती घेतली. बुधवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक झाली. प्रभाग रचनेबाबत चर्चा झाली. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९ आहे. त्यानुसार प्रभाग रचना आणि निवडणूक होणार आहे. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत १७ लाख लोकसंख्येला महापालिकेत १२८ नगरसेवक आणि ३२ प्रभाग होते. त्याप्रमाणे आताही ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक असणार आहेत. त्यात काही बदल होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल.
दरम्यान, प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. त्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रभाग रचनेची प्रक्रिया
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करून महापालिका आयुक्त हे राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवतील. प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यावर असणार आहे. प्रारूप प्रभाग रचना आयुक्तांकडून प्रसिद्ध केली जाईल. त्या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना घेऊन सुनावणी घेतली जाईल. सुनावणीनंतर अंतिम केलेल्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी आयुक्तांकडून सादर करण्यात येईल. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देईल.
प्रभाग रचना तयार करण्यासाठीचा कालमर्यादेचा राज्य निवडणूक आयाेगाचा आदेश एक-दाेन दिवसांत येईल. २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना करण्यात येणार आहे. एका प्रभागात ४९ ते ५९ हजार लाेकसंख्या असणार आहे. प्रभाग रचना आणि मतदारसंख्येचा काही संबंध नाही.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका