पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथील नीरज मेहरा यांना ओएलएक्सवरील जाहिरातीद्वारे ५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नीरज मेहरा यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज मेहरा यांना नवीन चारचाकी गाडी घ्यायची होती. त्यांनी ‘ओएलएक्स’वर इनोव्हा गाडीची जाहिरात पाहिली. त्यातील माहितीत उल्लेख केलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. नीरज आणि जाहिरात देणाऱ्या व्यक्तीमध्ये इनोव्हा गाडी विक्रीबाबत साडेपाच लाख रुपयांत व्यवहार झाला. धक्कादायक बाब म्हणजे जाहिरातदाराने गाडी विमानतळावर असून सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात असून, त्यांना ३२ हजार रुपये देऊन ती सोडवून घ्या, असे दूरध्वनीवरून सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नीरज यांनी बोगस सीमा शुल्क अधिकारी संतोष कुमार सिंग याच्या खात्यावर २० सप्टेंबरला ३२ हजार रुपये जमा केले. विशेष म्हणजे पैसे जमा केल्याची पावती मेलद्वारेही पाठवण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन जा, असे सांगण्यात आले. मात्र, ओएलएक्सवर जाहिरात देणाऱ्या व्यक्तीने पुन्हा फोन केला. माझी पत्नी आजारी असून मला पैशांची गरज आहे, असे नीरज यांना सांगितले. त्यामुळे नीरज यांनी खोरो पुई याच्या बँक खात्यात २१ सप्टेंबर २०१६ रोजी तब्बल ५ लाख १५ हजार रुपये जमा केले. त्यानंतर विमानतळावरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांकडून गाडी घेण्यासाठी नीरज तेथे गेले. परंतु, विमानतळावर अशा नावाचे कुणी सीमा शुल्क अधिकारी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे नीरज यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी वाकड पोलिसांत संतोष कुमार सिंग (उत्तर प्रदेश), खोरा पुई (दिल्ली), कृष्णाप्पा पी याच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad man cheating on olx advertise
First published on: 09-03-2017 at 14:05 IST