पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या (२०२५-२६) पहिल्या तिमाहीमध्ये ५२२ कोटी ७२ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला. ३० जूनपर्यंत असलेल्या विविध सवलतींचा लाभ घेत चार लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. या मालमत्ताधारकांना ३५ कोटी १६ लाखांचा लाभ सवलतीपोटी देण्यात आाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख ३३ हजार ६६४ निवासी, औद्याेगिक, मिश्र, माेकळ्या जमीन, औद्योगिक अशा मालमत्ता आहेत. मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नांचा मुख्य स्त्रोत आहे. यंदा विभागाला एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पहिल्या तिमाहीत निम्मे उद्दिष्ट पूर्ण करण्यात विभागाला यश आले.
कर संकलन विभागाने महिला बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी देयकाचे वितरण केले. ३० जून पर्यंत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सामान्य करावर दहा टक्के सवलत देण्यासह विविध सवलती महापालिकेने जाहीर केल्या होत्या. या सवलती समाजमाध्यमाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविल्या. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे. १ एप्रिल ते ३० जून २०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चार लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत ४४० कोटी रुपयांची कर वसुली झाली होती. यंदा त्यात ८२ कोटी ७२ लाखाने वाढ झाली असून, ५२२ कोटी ७२ लाखांची वसुली झाल्याचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.
वाकड विभागातून सर्वाधिक कर
महापालिकेची १८ विभागीय कर संकलन कार्यालये आहेत. त्यामध्ये वाकडमधून सर्वाधिक ६५ कोटी ११ लाखांचा तर सर्वांत कमी पिंपरी नगरमधून चार कोटी २४ लाखांचा कर वसूल झाला आहे. थेरगाव ४७ कोटी ५२ लाख, चिखली ३९ कोटी ३५ लाख, कस्पटे वस्ती ३७ कोटी ६० लाख, किवळे ३४ कोटी २३ लाख, भोसरी ३३ कोटी ९५ लाख, चिंचवड ३३ कोटी तीन लाख, पिंपरी वाघेरे ३२ कोटी ८४ लाख, मोशी ३० कोटी ५३ लाख, सांगवी २७ कोटी नऊ लाख, मनपा भवन २८ कोटी २२ लाख, आकुर्डी २४ कोटी ३३ लाख, फुगेवाडी दापोडी १८ कोटी ४९ लाख, चऱ्होली १६ कोटी ३७ लाख, निगडी प्राधिकरण १२ कोटी ७७ लाख, तळवडे १२ कोटी ९० लाख आणि दिघी बोपखेलमधून १७ कोटी ८४ लाखांचा कर वसूल झाला आहे.
ऑनलाइन भरण्यात वाढ
ऑनलाइन कराचा भरण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. तीन लाख २३ हजार २३९ नागरिकांनी ३८० कोटी ४८ लाखांचा कर ऑनलाइन पद्धतीने भरला आहे. ही संख्या एकूण कर भरणाऱ्यांच्या तुलनेत ७३ टक्के आहे. रोखीत ३० कोटी ६३ लाख, धनादेशाद्वारे २३ कोटी ६६ लाख, आरटीजीएसद्वारे २३ कोटी ५३ लाख रुपयांचा कर भरण्यात आला आहे. सोमवारी एकाच दिवशी ३४ कोटी ४९ लाख रुपयांचा भरणा झाला आहे.
वसुलीसाठी व्यापक मोहीम
थकबाकीसह मूळ कर वसुलीसाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. निवासी मालमत्ताधारकांचे वाहन, टीव्ही, फ्रिज यांसारख्या वस्तू जप्त करण्यात येणार आहेत. वारंवार आवाहन करून देखील मालमत्ताकराची थकबाकी न भरणाऱ्यांवर जप्ती सारखी कठोर कारवाई करण्याचे नियोजन केल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.
नियोजन, विदा (डेटा) विश्लेषण करून त्याआधारे विविध माध्यमांतून केलेली जनजागृती, बचत गटांमार्फत घरोघरी पोहोचवण्यात आलेली मालमत्ता करांची देयके, विविध सवलतींना नागरिकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे पहिल्या तिमाहीत ५२२ कोटींचा कर वसुलीचा टप्पा पार झाला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वांत जास्त मालमत्ता कर वसुली होईल, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.- शेखर सिंह,आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका