पिंपरी : महापालिकेकडून ओला व सुका कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रक्रिया केली जात आहे. कचरा विलगीकरण झाले नाही, तर कचरा उचलला जाणार नाही. कचरा विलगीकरण करून न दिल्यास ५०० ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. आजपासून एमआयडीसी परिसरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ही माहिती दिली. या वेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा… पुणे : भावी खासदार म्हणून भाजप शहराध्यक्षांची फलकबाजी

केंद्र, राज्य सरकारने २०१६ मध्ये कचरा विलगीकरण करणे बंधनकारक केले आहे. ९० टक्के कचरा विलगीकरण होत आहे. शहरात शंभर किलोपेक्षा आधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांनी त्यांच्या स्तरावरच कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारून खत निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवे. केंद्र सरकारच्या २०१६ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या संस्थांनी त्यांच्या स्तरावरच प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… पुणे : मेट्रो मार्गिकांलगत रेडीरेकनरचे उच्चांकी दर

नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्र देण्यावर भर दिला पाहिजे. शहरातील सर्वच नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्र द्यावा. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने वेळोवेळी जनजागृती, सोसायटीधारकांशी, एमआयडीसीमधील उद्योजकांशी बैठक घेतली आहे. त्यांना ओला व सुका कचरा वेगळा देण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार आजपासून पहिल्या टप्प्यात एमआयडीसी भागातील ओला व सुका असा स्वतंत्र कचरा देणाऱ्यांचाच कचरा स्वीकारला जाणार आहे. कचरा विलगीकरण करून न दिल्यास ५०० ते ५० हजारापर्यंत दंड आकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

करोनाला घाबरू नका, काळजी घ्या

सध्या शहरात करोनाचे २०८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांपैकी केवळ चार पालिका रुग्णालयात उपचार घेत असून, इतर रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. मात्र, करोनाबाबत केंद्र सरकारने उपाययोजना करण्यासंदर्भात पालिकेला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पालिकेच्या वायसीएमसह सर्व रुग्णालयांत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, आयसीयू बेड उपलब्ध ठेवले असून, सर्व यंत्रणा सज्ज आहे. वैद्यकीय विभागाची आढावा बैठक घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation decided to stop collection of unsegregated waste from midc from today pune print news ggy 03 asj
First published on: 01-04-2023 at 12:05 IST