पिंपरी : गेल्या सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढील दीड महिना नवीन घरगुती, व्यावसायिक नळजोड न देण्याबाबत विचार सुरू केला आहे. पिण्याचे पाणी वापरणारे वाॅशिंग सेंटर चालक, नळजाेडाला थेट विद्युत पंप लावून पाणी उचलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याचा फेरवापर न करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, मोठ्या व्यावसायिक मालमत्तांवर कारवाईचा इशाराही महापालिकेने दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लाेकसंख्या ३० लाखांच्या घरात गेली आहे. लाेकसंख्या वाढत असताना पाणीपुरवठा मात्र केवळ ३५ टक्क्यांनी वाढला आहे. सद्य:स्थितीत दिवसाला ६४० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलण्यात येते. हे पाणी अपुरे पडत असल्याने गेल्या सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पवना, आंद्रा धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. बोअरवेल कोरडे पडले आहेत. गृहनिर्माण साेसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बंद आहेत. अनधिकृत नळजाेडांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विस्कळीत आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढल्याचा महापालिकेचा दावा आहे. संपूर्ण शहरातून विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
थेट नळाला पंप लावून पाणी उपसा करण्यास मनाई करण्यात आली असून, आतापर्यंत अडीचशेपेक्षा जास्त पंप जप्त करण्यात आले आहेत. अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात येणार असून, वाॅशिंग सेंटर चालकांनी पिण्याचे पाणी वापरल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोसायट्यांनी प्रक्रिया केलेले पाणी ठिबक सिंचनाद्वारे झाडांना द्यावे, पाणी टाक्यांची गळती तपासावी, पाण्याचे लेखापरीक्षण करावे, अनधिकृत नळजोडणी आणि पाण्याच्या गैरवापराची माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पथकाद्वारे तपासणी
बांधकाम सुरू असलेले गृहप्रकल्प, वाॅशिंग सेंटरची तपासणी महापालिकेचे पथक करणार आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर, या पाण्याने वाहने, रस्ते धुणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
उन्हाळा असेपर्यंत आणि पावसाळा सुरू होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. अनधिकृत नळजोड घेऊ नये. पाणीपुरवठा सुरळीत राहण्याकरिता आगामी दीड महिन्यासाठी नवीन नळजोड न देण्याबाबत विचार सुरू आहे.अजय सूर्यवंशी सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका