पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय विभाजित करण्यात आलेली प्रारूप मतदारयादी सहा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर १४ नोव्हेंबर पर्यंत नागरिकांना हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. प्रभागनिहाय आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि भोर विधानसभा मतदारसंघ (ताथवडे गाव) या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादी प्रभागनिहाय विभाजन करून तयार करण्यात आली आहे. ही प्रारूप मतदार यादी सहा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर १४ नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील मतदार यादी कक्षात तसेच सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत प्रत्यक्ष दाखल करता येणार आहेत. मतदार यादीवरील हरकती व सूचनांवर छाननी, सुनावणी व निर्णय घेण्यासाठी सहशहर अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांची क्षेत्रीय कार्यालयानिहाय प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांची ‘अ’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी , अनिल भालसाकळे यांची ‘ब’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयासाठी , माणिक चव्हाण हे ‘ड’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयासाठी आणि सुनील भागवानी यांची ‘’क’ व ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या प्राधिकृत अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंता यांची सहायक प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हरकती व सूचनांची तपासणी करून आवश्यक अहवाल प्राधिकृत अधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे.
चिंचवडमध्ये मंगळवारी आरक्षण सोडत
प्रभागनिहाय आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) तसेच खुल्या (ओपन) गटातील या सर्व राखीव जागांवर महिलांसाठी असलेल्या जागेसाठी आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार आहे. त्यात कोणत्या प्रभागात महिला आरक्षण पडणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. महापालिकेचे चार सदस्यीय एकूण ३२ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात दोन जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत.
आरक्षण सोडतीसाठी चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती
महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बिहार विधानसभा निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरक्षण सोडतीकरिता पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांणी यांनी काढला आहे. ही सोडत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली काढली जाणार असून त्याचा अहवाल आयोगास सादर केला जाईल.
आरक्षण सोडतीवरही हरकती, सूचना
यंदा आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यावर निर्णय घेऊन महापालिका आयुक्त दोन डिसेंबरला आरक्षण अंतिम करणार आहेत. त्यानंतर आरक्षण सोडत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रारुप मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. आरक्षण सोडत मंगळवारी काढली जाणार आहे. आरक्षण सोडतीची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमानुसार सोडत काढली जाईल, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
