पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने हरित ऊर्जेकडे वाटचाल करत सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा स्वावलंबनाचा नवा टप्पा गाठला आहे. महापालिकेने स्वमालकीच्या विविध इमारतींवर सौर यंत्रणा (सोलर रुफटॉप) कार्यान्वित केल्या असून, याद्वारे प्रतितास तीन मेगावॅट क्षमतेची वीज तयार होत आहे. यामुळे महापालिकेच्या वीज देयकात पाच कोटी ९१ लाख रुपयांची बचत झाली आहे.

शहराची पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महापालिकेने शाश्वत विकास कक्षाची स्थापना केली आहे. त्याद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करत स्वमालकीच्या इमारतींवर सौर यंत्रणा उभारली आहे. यामध्ये पिंपरी येथील महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, शाळा, स्मशानभूमी, जलतरण तलाव, नाट्यगृह, बॅडमिंटन हॉल, रुग्णालये अशा विविध ८६ ठिकाणी सौर ऊर्जेचे प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. याद्वारे सप्टेंबर २०२५ पर्यंत ५९ लाख १७ हजार ११२ युनिट्स वीज निर्मिती करण्यात आली आहे.

५८ ठिकाणी चार मेगावॅट क्षमतेची सौर प्रणाली

सौर ऊर्जेच्या वापरामुळे महापालिकेच्या वीज खर्चात मोठी घट झाली आहे. भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेऊन महापालिकेने आणखी १३ ठिकाणी ४५० किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेचे काम हाती घेतले असून, ते प्रगतीपथावर आहे. याशिवाय ५८ ठिकाणी चार मेगावॅट क्षमतेची सौर प्रणाली उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर होऊन पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील ताण कमी होईल आणि स्वच्छ व पर्यावरणपूरक वाटचालीला गती मिळेल, असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

  • तीन मेगावॅट वीज, प्रतितास
  • ५९ लाख १७ हजार ११२ युनिट्स वीज तयार
  • पाच कोटी ९१ लाख ७६ हजार ११२ रुपयांची वीज देयकांमध्ये बचत
  • नियोजित प्रकल्पाची क्षमता चार मेगावॅट

महापालिकेसाठी आवश्यक असणाऱ्या विजेसाठी कचऱ्यापासून वीज निर्मिती (वेस्ट टू एनर्जी) व सोलर एनर्जी यांसारख्या अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. यातून आर्थिक बचत होत आहे. आगामी काळात हे शहर ‘नेट झिरो’ बनवण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.

हरित ऊर्जेकडे वाटचाल ही केवळ विजेची बचत नसून, ती शहराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढवून महापालिका पर्यावरण संवर्धन, आर्थिक बचत या उद्दिष्टांना साध्य करत आहे, असे सह शहर अभियंता अनिल भालसाखळे यांनी सांगितले.