पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागामार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत १५ कोटी ५३ लाख ११ हजार ७३० रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक सहा कोटी ५३ लाख ५ हजार १५९ एवढी रक्कम ऑनलाइन जमा झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४५ लाखांची अधिक वसुली झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक असे मिळून एक लाख ८० हजार ९०६ नळजोडधारक आहेत. त्यांच्याकडून विविध माध्यमांतून पाणीपट्टी भरली जात आहे. करसंकलन विभागाच्या कार्यपद्धतीमुळे ही वसुली अधिक प्रभावीपणे पार पडली. मात्र, अद्यापही ३२ हजार ४६० नळधारकांची पाणीपट्टी थकीत आहे. थकबाकीदारांनी लवकरात लवकर पाणीपट्टी भरावी, अन्यथा नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
दरम्यान, ऑनलाइन माध्यमातून सर्वाधिक सहा कोटी ५३ लाख पाच हजार १५९, धनादेशाद्वारे पाच कोटी ९० लाख ९८ हजार ५८५, रोख स्वरूपात तीन कोटी नऊ लाख सात हजार ९८६ रुपये पाणीपट्टीचा भरणा झाला आहे.
मीटर दुरुस्तीबाबत नोटीस
पाणीपुरवठा विभागामार्फत ग्राहकांना नादुरुस्त अथवा बंद असलेले पाणीमीटर दुरुस्त करण्याबाबत लवकरच नोटीस देण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी पाणीमीटर नादुरुस्त असल्याने रीडिंग घेणे शक्य होत नाही. त्यामुळे देयकात अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन पाणीमीटर लवकरात लवकर दुरुस्त करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.
वर्षनिहाय पहिल्या तिमाहीत वसूल झालेली पाणीपट्टी
आर्थिक वर्ष – पाणीपट्टी (कोटी रुपयांत)
- २०१९-२० – ३,१७,३२,१७०
- २०२०-२१ – १०,०९,४२,५६०
- २०२१-२२ – १०,४८,४९,३७०
- २०२२-२३ – १२,५८,२१,७३३
- २०२३-२४ – १३,९५,५८,३८१
- २०२४-२५ – १५,०८,१९,६५१
- २०२५-२६ – १५,५३,११,७३०
मालमत्ताकरासोबत पाणीपट्टी वसूल करण्याचा निर्णय महसूलवाढीच्या दृष्टिकोनातून योग्य ठरला आहे. नागरिकांनी वेळेत कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. अन्यथा थकबाकीदारांवर कारवाईशिवाय पर्याय नाही. – प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.