पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाज विकास विभाग आणि सीफार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वस्ती संसाधन केंद्राची निर्मिती करण्यात आली. निगडीतील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत गरजूंपर्यंत योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, सहायक आयुक्त अतुल पाटील, निवेदिता घार्गे, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे, ज्ञानेश्वर ढवळे, सहायक समाज विकास अधिकारी संतोषी चोरगे या वेळी उपस्थित होत्या.
महापालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक सुरक्षा, आरोग्य व नागरी सुविधाविषयक योजनांचा लाभ समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचविणे हा वस्ती संसाधन केंद्राचा मुख्य उद्देश आहे.
या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विविध वस्ती पातळ्यांवर जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये योजनांविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे. विविध योजनांची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वस्ती संसाधन केंद्र उपयुक्त ठरेल. या माध्यमातून वंचित घटकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचा व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्याद्वारे समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपलब्ध योजना सहाय्यभूत ठरतील, असे उपायुक्त शिंदे यांनी सांगितले.
शासकीय योजना आणि लाभार्थी यांच्यामध्ये असलेली दरी भरून काढण्यासाठी, गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी वस्ती संसाधन केंद्राने काम करावे. समाजातील गरजू घटकांना माहिती, योजनांचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. – ममता शिंदे, उपायुक्त, समाज विकास विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका