पिंपरी : विजेचा अपव्यय टाळण्यासाठी आणि आवश्यक त्या ठिकाणी विजेची बचत करण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेने पाऊल उचलले आहे. महापालिकेची प्रशासकीय कार्यालये, सर्व रुग्णालये, नाट्यगृहे आदी ठिकाणी वीज बचतीच्या दृष्टीने गतिसंवेदक यंत्रणा (मोशन सेन्सर) बसविण्यात येणार आहेत. आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत सर्व विभागांना निर्देश दिले आहेत.
हेही वाचा >>> पुणे: राज्यात पाच दिवस पावसाचे; घाटमाथा, कोकण, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
महापालिकेच्या प्रशासकीय इमारतींमध्ये काही ठिकाणी विजेची आवश्यकता नसताना देखील दिवे सुरू असतात. त्यामुळे विजेचा नाहक अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले. विजेचा अपव्यय टाळण्यासाठी गतिसंवेदक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. व्यक्तीच्या हालचालींनुसार दिवे चालू अथवा बंद करणारी स्वयंचलित यंत्रणा या माध्यमातून कार्यान्वित होणार आहे. महापालिकेच्या सर्व प्रशासकीय इमारती, रुग्णालये, नाट्यगृहांचा आतील सार्वजनिक परिसर, स्वच्छतागृहांमध्ये ही यंत्रणा बसविली जाणार आहे. विद्युत विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून अशी ठिकाणे निवडली जाणार आहेत. अशा यंत्रणेमुळे विजेचा गैरवापर टाळण्यास मदत होणार असून, विजेची बचत होईल, असे सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी सांगितले.