पिंपरी- चिंचवड: भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी “अब की बार शंभर पार” चा नारा पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी दिला आहे. महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचल्याच बोललं जात आहे. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत. त्याआधी भाजप आमदार महेश लांडगे हे अजित पवारांची डोकेदुखी ठरू लागले आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. राज्यामध्ये महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्र आहेत. परंतु, आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची भाषा महायुतीतील नेते करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अप्रत्यक्षपणे आगामी महानगरपालिका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर अजित पवारांचे लक्ष आहे. अजित पवारांचे पिंपरी- चिंचवड मध्ये दौरे देखील झाले. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मूठ बांधण्याचा प्रयत्न ते करत आहेत. परंतु, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी त्यांना स्थानिक भाजपशी दोन हात करावे लागणार आहेत. अजित पवारांसमोर आमदार महेश लांडगे यांचं कडवं आव्हान असणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांचं पडद्यामागील राजकारण सर्वश्रुत आहे. शंभरी पार म्हणत महेश लांडगे यांनी देखील अजित पवारांना डिवचल्याच पाहायला मिळत आहे. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे मावळते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची नाशिक येथे बदली झाली. मेट्रो व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवला आहे. यानंतर महेश लांडगे यांनी “अब की बार शभर पार” नारा दिला आहे. तशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामुळे हा निव्वळ योगायोग म्हणायचा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपच्या कार्यकाळात श्रावण हर्डीकर हे पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचा पदभार दिला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, तर भाजपच्या गोठात आनंदी वातावरण दिसत आहे. आगामी काळात पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर राष्ट्रवादी की भाजपची सत्ता येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु, त्याआधी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता संघर्ष बघायला मिळेल हे मात्र नक्की.