लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : रात्री अपरात्री फटाक्यासारख्या आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बुलेटला बसविण्यात आलेले सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले. डांबरीकरणासाठी वापरला जाणारा रोडरोलर सायलेन्सरवर चालवून ते नष्ट करण्यात आले. पोलिसांनी या कारवाईत ५४२ सायलेन्सर नष्ट केले. याप्रकरणी चार हजार ८५३ जणांवर गुन्हे दाखल केले असून, ४८ लाख ४९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून शहर, परिसरात भरधाव बुलेट चालवून सायलेन्सरमधून फटाक्यासारखे आवाज काढण्यात येत असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार (मॉडिफाय) करण्यात आल्याने त्यातून फटाक्यासारखा आवाज निघतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय परिसरात या आवाजामुळे त्रास होतो. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.
त्या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत अशा वाहनचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. वाहतूक पोलिसांनी एक जानेवारी ते दहा एप्रिल २०२५ या सव्वातीन महिन्यांत अनधिकृतपणे वाहनामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर निगडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांच्या उपस्थितीत जमा असलेले ५४२ सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या वाहनचालकांवर नियमितपणे कारवाई करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाई सुरूच राहील. -बापू बांगर, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड