पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी धूळखात पडलेली बेवारस वाहने पोलिसांनी जमा केली आहेत. ती मोशी कचरा डेपोजवळील मैदानात ठेवली आहेत. संबंधितांनी कागदपत्रे दाखवून आपले वाहन घेऊन जाण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. ठरावीक मुदतीनंतर त्यांचा लिलाव केला जाणार आहे.

शहरातील रस्त्यांवर, मोकळ्या जागांवर ठिकठिकाणी बेवारस वाहने लावली जातात. पोलिसांकडून ती जप्त करून मोशी येथील कचरा डेपोजवळील मोकळ्या मैदानात ठेवली जातात. यातील अनेक वाहनांची कालमर्यादा उलटून गेल्याने वाहनमालकांकडून दुर्लक्ष केले जाते. रस्त्यांवर लावलेल्या वाहनांमुळे कोंडी होते. परिसर विद्रूप होतो. तसेच एकाच ठिकाणी राहिल्याने वाहने सडतात. पोलिसांनी जप्त केलेली वाहनेदेखील सडली आहेत. ही जागा वाहने ठेवण्यासाठी अपुरी पडत आहे.

संबंधित वाहनांच्या मालकाला वाहन घेऊन जायचे असल्यास त्यांनी १० ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मोशी येथील वाहनतळाला भेट द्यावी. तिथे आपले वाहन आहे का, याची खात्री करावी. त्यानंतर संबंधित वाहनाची मूळ कागदपत्रे, चासी क्रमांक, आरटीओ क्रमांक अशी कागदपत्रे वाहतूक विभागाकडे सादर करावीत. वाहनावरील प्रलंबित दंड भरावा. त्यानंतर वाहनमालकाने वाहन घेऊन जावे. २४ ऑक्टोबरपर्यंत वाहन घेऊन न गेल्यास या वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोशीतील वाहनतळावर लावलेली वाहने संबंधित मालकांनी दंड भरून, कागदपत्रे सादर करून घेऊन जावीत. न नेलेल्या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे, असे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले.