पिंपरी : सक्षम आणि व्यापक आरोग्य सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून आयुष्मान योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात ७९ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारली जाणार आहेत. आतापर्यंत ३६ ठिकाणी ही केंद्रे कार्यान्वित झाली असून, त्यामध्ये जिजाऊ क्लिनिक विलीन केले जात आहे. उर्वरित ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात असून, या केंद्रामुळे नागरिकांना घराजवळ उपचार मिळण्याबरोबरच मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होत असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले.

वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये आठ मोठी रुग्णालये, २७ दवाखाने, २० आरोग्य केंद्रे, आठ कुटुंब नियोजन केंद्रे, ३६ लसीकरण केंद्र आहेत. ७५० खाटांच्या क्षमतेचे सर्वांत मोठे वायसीएम, ४०० खाटांचे थेरगाव, १०० खाटांचे नवीन भोसरी, १३० खाटांचे नवीन आकुर्डी आणि १२० खाटांचे नवीन जिजामाता यासह एक हजार ५८९ खाटांची व्यवस्था महापालिकेच्या रुग्णालयांत आहे.

महापालिकेचे प्राथमिक दवाखाने प्रामुख्याने लहान आजारांवरील तपासणी व औषधे पुरवतात, तर जिजाऊ क्लिनिकमध्ये महिलांसाठी स्त्रीरोग तपासणी, माता-बाल आरोग्य, लसीकरण यावर भर दिला जातो. परंतु, नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच छताखाली मिळावी, यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र ही नवी संकल्पना राबवली जात आहे. शहरात ७९ ठिकाणी ही केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यांपैकी ३६ ठिकाणी केंद्रे पूर्ण मनुष्यबळासह कार्यान्वित झाली आहेत. वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांची नेमणूक केली आहे. त्यात प्रत्येक केंद्रावर एक डॉक्टर, एक परिचारिका, एक केमिस्ट आणि एक वर्ग चारचा कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत.

आरोग्यवर्धिनीची वैशिष्ट्ये

– सर्वसामान्य तपासणी करता येणार

– बाल आरोग्य, माता-बाल सेवा सुविधा

– रुग्णांवर अल्प खर्चात सुलभ उपचार

– घराजवळ लसीकरण

महापालिका हद्दीतील ७९ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यात येत आहेत. त्यांपैकी ३६ ठिकाणी कार्यान्वित झाली आहेत. काही ठिकाणी जागेच्या अडचणी येत आहे. त्या सोडवून डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने सर्व ठिकाणी ती सुरू केले जातील. या केंद्रांमुळे रुग्णांना घराजवळ, तत्काळ उपचार आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मिळतील, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधेवर ताण येण्याची शक्यता आहे. यासाठीच राज्य सरकारच्या सूचनेनुसार आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ७९ आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यात येत आहेत. नागरिकांना घराजवळच प्राथमिक उपचार मिळाल्याने रुग्णालयांवरील ताण कमी होईल. गरजूंना लवकर उपचार देणे शक्य होईल. शासनामार्फत आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या सेवा पुरविणे शक्य होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केला.