सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धता या तीन निकषांवर काढण्यात आलेल्या राज्यातील २७ महापालिकांच्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात पिंपरी- चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला असून, पुणे महापालिका मात्र पिछाडीवर गेली आहे. महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल ॲप आणि समाज माध्यमांतील खात्यांवरील माहितीवर हा निर्देशांक निश्चित करण्यात आला असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेने १० पैकी ६.२३, तर पुणे महापालिकेने ४.४७ गुण प्राप्त केले आहेत.

‘पॉलिसी रिसर्च ऑर्गनायजेशन’ या संस्थेतर्फे दरवर्षी राज्यातील महापालिकांच्या ई-गव्हर्नन्सचा आढावा घेतला जातो. यंदा घेण्यात आलेल्या आढाव्यात मीरा भाईंदर महापालिकेने ५.७९ गुण मिळवत द्वितीय स्थान, तर नाशिक महापालिकेने ४.७४ गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
उपलब्धता, सेवा आणि समाज माध्यम वापर अशा स्वतंत्र निकषांवर पुणे महापालिकेने चांगली कामगिरी केली असली तरी एकूण गुणांच्या निकषावर मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने बाजी मारल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – पुणे : पीएमआरडीए क्षेत्रात विकासकामांना मिळणार वेग, आयुक्तांना १५ कोटी रुपयांपर्यंतच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार

या निर्देशांकाचे काम सुरू करण्यापूर्वी सर्व महापालिकांना पत्र पाठवून या अभ्यासाबाबत कल्पना देण्यात आल्याचे ‘पॉलिसी रिसर्च ऑर्गनायजेशन’ तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मालेगाव, धुळे, अहमदनगर, परभणी, चंद्रपूर, अकोला आणि भिवंडी-निझामपूर महापालिकांची सर्व निकषांवर अत्यंत निकृष्ट कामगिरी असल्याचे या निर्देशांकातून समोर आले आहे.

जळगाव, पनवेल आणि औरंगाबाद महापालिकांची कामगिरी गेल्यावर्षीच्या तुलनेत सुधारली असून धुळे, मालेगाव आणि अहमदनगर महापालिकांची कामगिरी खालावली आहे. सर्व महापालिकांबाबत केलेला हा अभ्यास संख्यात्मक असून गुणात्मक नाही, असे या निमित्ताने ‘पॉलिसी रिसर्च ऑर्गनायजेशन’ कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – पुणे : जमिनींविषयक वाद कायमचे सोडविण्यासाठी नागरिकांना संधी, शासनाचे महाराजस्व अभियान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपलब्धता निकषावर पिंपरी चिंचवड महापालिकेने ८.५७, तर पुणे महापालिकेने ५.२४ गुण मिळवले आहेत. पारदर्शकता निकषावर पुणे महापालिकेला स्थान पटकावता आले नसून पिंपरी-चिंचवड महापालिकेने मात्र ६.३६ गुण प्राप्त केले आहेत. सेवा निकषावर पुणे महापालिकेने ५.७१ गुण मिळवले आहेत. संकेतस्थळ कार्यक्षमता निकषावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ७.०५ गुण मिळवले आहेत. मोबाइल ॲप या निकषावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ५.०, तर पुणे महापालिकेने ३.४ आणि समाज माध्यम निकषावर पिंपरी- चिंचडवड महापालिकेने १० पैकी १० गुण मिळवले असून, पुणे महापालिकेला ६.६७ गुणांवर समाधान मानावे लागले आहे.