पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरातील लघुउद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत स्थापन केलेल्या उद्योग सुविधा कक्षाचे कामकाज गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाल्याचा आरोप फाेरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केला आहे. कक्षाचे कामकाज सुरळीत सुरु असल्याचे दावा महापालिकेने केला आहे.
महापालिका व स्थानिक उद्योजकांमध्ये संवाद वाढावा, उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तत्काळ निराकरण व्हावे, औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी महापालिकेने ‘उद्योग सुविधा कक्ष’ स्थापन केला आहे. औद्योगिक गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणे. व्यापारी, उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेणे व त्याचे निराकरण करणे. गुंतवणूकदार उद्योजकांना प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय सहकार्य या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले होते. मात्र, या उद्योग कक्षातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.
अभय भोर म्हणाले, ‘उद्योजक शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. एमआयडीसी परिसरातील उद्योजकांकडून महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर मिळतो. मात्र, महापालिकेकडून पायाभूत सुविधा दिल्या जात नाही. या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाचा प्रतिसाद मिळ नाही. उद्याेजकांना एमआयडीसी परिसरात पायाभूत सुविधांची कमतरता जाणवत आहे. वीज, चांगले रस्ते, महिला कामगारांना बस सेवा, उद्यान, पावसाळी वाहिन्या, स्वच्छतागृह अशा विविध समस्या एमआयडीसी परिसरात आहे. या उद्याेजकांच्या या समस्या साेडविण्यासाठी महापालिकेने माेठा गाजावाजा करत उद्योग सुविधा कक्षाची स्थापना केली.
मात्र, फक्त दोन बैठकांवरच कक्षाचा प्रवास थांबला आहे. त्यामुळे उद्योग सुविधा कक्ष केवळ देखावा करण्यासाठी सुरू केला हाेता का? उद्योजकांना न्याय कधी मिळणार? एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना रोज नवनव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अनेक दिवसांपासून उद्योगांसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याची मागणी असतानाही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाने तातडीने उद्याेजकांची बैठक बाेलवावी, अन्यथा आंदाेलन करण्यात येईल’, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
उद्योग सुविधा कक्षाचे कामकाज नियमितपणे सुरु आहे. कक्षाच्या माध्यमातून उद्योजकांना मदत केली जात आहे.-विजय बोरुडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
