पिंपरी : फ्रेशर्स पार्टीचा पोस्टर लावल्याच्या कारणावरून एका स्वयंघोषित भाईने तरुणाकडे २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली आणि त्याच्यासोबत मारहाण केल्याची घटना बुधवारी किवळे येथील एका महाविद्यालयाजवळ घडली. या प्रकरणी १७ वर्षीय तरुणाने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टीच्या जाहिरातीचा पोस्टर लावत होते. तेव्हा आरोपी तिथे आले. त्याने पोस्टर फाडून ‘तुम्ही इथे फ्रेशर्स पार्टी घेऊ शकत नाही आणि जर घ्यायची असेल तर मला २५ हजार रुपये द्यावे लागतील, कारण मी इथला भाई आहे’, अशी धमकी दिली. पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी देऊन त्याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादीच्या पोटात आणि डोक्यात ठोसे मारून जखमी केले. फिर्यादीच्या खिशातून तीन हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. रावेत पोलीस तपास करत आहेत.

वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणावर वाल्हेकरवाडीत कोयत्याने वार

जुन्या व्यवहाराच्या वादातून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना वाल्हेकरवाडी येथे घडली. या प्रकरणी अमोल पांडुरंग शिंदे (२८, रावेत) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विकास प्रल्हाद शिंदे (वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ अजिनाथ शिंदे आणि त्याची पत्नी भाजी खरेदी करत असताना, आरोपी विकास याने जुन्या व्यवहारावरून त्यांच्यासोबत वाद घातला आणि शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री फिर्यादी अमोल हे वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी आले. तेव्हा आरोपीने त्याची रिक्षा फिर्यादीच्या गाडीसमोर लावली, रिक्षातून कोयता घेऊन खाली उतरला आणि फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पंजावर वार करून जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करित आहेत.

हिंजवडीत मिक्सरच्या धडकेत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

हिंजवडी परिसरात जड वाहनांना मनाई असलेल्या वेळेत बेदरकारपणे मिक्सर ट्रक चालवून एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी हिंजवडी येथील इन्फोसिस सर्कलजवळील सार्वजनिक रस्त्यावर घडली.

प्रत्युषा संतोष बोराटे (११) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी सागर सुभाष आगलावे (४५, बुधवार पेठ, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फरहान मुन्नू शेख (२५, वाकड, पुणे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ या वेळेत जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई आहे. आरोपी फरहान शेख याने या नियमाचे उल्लंघन करून, भरधाव वेगाने मिक्सर ट्रक चालवली. त्याने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला वैशाली बोराटे या गंभीर जखमी झाल्या. तर ११ वर्षांच्या प्रत्युषा बोराटे हिचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

भोसरीत मेफेड्रोन विक्री प्रकरणी दोघांना अटक

भोसरी येथील पुणे-नाशिक हायवे रोडवर मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा मेफेड्रोन आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (१३ ऑगस्ट) पहाटे करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई सचिन मोरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मेहबूब चाँद शेख (२५, कोंढवा खुर्द, पुणे) आणि नासिर चाँद शेख (२७, कासारवाडी, पुणे) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ६.८४ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन, १२ हजार रुपयांचा मोबाईल, ९ रिकामे प्लास्टिक पाऊच, ३ लाख ४० हजार रुपये किमतीची एक रिक्षा आणि काही रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे अमली पदार्थांची बेकायदेशीररीत्या विक्री करण्यासाठी हे पदार्थ बाळगत होते. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

मोशीत ७८ हजार रुपयांचे अफिम जप्त

अफिम विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी मोशी येथे एकाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ७८ हजार ४०० रुपये किमतीचे १०२ ग्रॅम अफिम आणि तीन लाख रुपयांची मोटार जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी (१३ ऑगस्ट) दुपारी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील देवासी किराणा दुकानासमोर पार्किंगमध्ये करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई कपिलेश इगवे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ओमाराम वेनाराम देवासी (२४, बोऱ्हाडेवाडी, मोशी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमाराम देवासी याने त्याच्या मोटारीमध्ये १०२ ग्रॅम वजनाचा अफिम बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगला होता. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला अटक करून त्याच्याकडून अफिम आणि गाडी असा एकूण ३ लाख ७८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.