पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथे एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना चिखली येथे घडली. याप्रकरणी ३१ वर्षीय तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखिल दिलीप भागवत (३२, आकुर्डी, पुणे) याला अटक करण्यात आली. एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिलने स्वतःला ‘रावण गँग’चा सदस्य असल्याचे सांगत फिर्यादीकडे बांधकाम व्यवसायासाठी महिन्याला एक लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यावर आरोपीने शिवीगाळ करत त्यांना दगडाने मारहाण केली आणि ‘मी रावण गँगचा सदस्य आहे, जो कोणी मध्ये येईल त्याचा जीव घेईन’ अशी धमकी दिली. चिखली पोलीस तपास करित आहेत.

चाकणमध्ये मशीन देण्याच्या बहाण्याने फसवणूक

कचाकण येथे एकाची मशीन देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मशिनची माहिती देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या पत्नीकडून वेळोवेळी एकूण तीन लाख ८९ हजार ५२० रुपये घेतले, तरीही मशीन दिली नाही आणि त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी चाकण पोलीस पुढील तपास करित आहेत.

पिंपरीत तडीपार आरोपीकडून शस्त्रसाठा जप्त

पिंपरी येथील तडीपार केलेल्या आरोपीला बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना पिंपरी येथील रेल्वे लाईनजवळ घडली. या प्रकरणात पोलीस हवालदार देवा राऊत यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश उर्फ मॅड गण्या भुंगा कांबळे (२४, भाटनगर समोर रेल्वे लाईन, निराधार नगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही त्याने कोणतीही परवानगी न घेता तडीपार आदेशाचे उल्लंघन केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल, एक हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे आणि ५०० रुपये किमतीचा एक शिकारी चाकू असा एकूण एक लाख एक हजार ५०० रुपये किमतीचा शस्त्रसाठा बेकायदेशीरपणे आढळला. पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

तळेगाव दाभाडे येथे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

तळेगाव दाभाडे येथे एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुधाकर विश्वनाथ केंद्रे (पोलीस अंमलदार, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुस्तकीम मोहसीन गदवाल (१९, जांभुळगाव, मावळ,) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे बेकायदेशीरपणे ३५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. आरोपीकडे हे शस्त्र बाळगण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नव्हती. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

भोसरीत पीएमपीएमएल बसमध्ये मोबाईल चोरी

बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळवून नेल्याची घटना भोसरीतील पीएमपीएल बस स्थानकावर घडली.या प्रकरणात शामसुंदर दत्तात्रय साळुंखे (२०, तुकाईदर्शन, प्रभात कॉलनी, फुरसुंगी, हडपसर, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हरीषसिंग श्रीनंदनसिंग बिस्ट (३०, सविधांन चौक, भोसरी, पुणे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बसमध्ये चढत असताना एका अनोळखी चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील ३५,००० रुपये किमतीचा एप्पल कंपनीचा आयफोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि पळून गेला. भोसरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.