पिंपरी : लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन झालेल्या पिंपरी ते निगडी या ४.५१९ किलोमीटर अंतराच्या महामेट्रोच्या विस्तारित मार्गाचे काम अखेर सुरू झाले आहे. त्यातील मार्गिकच्या ‘व्हायडक्ट’ या कामाचा ठेका केंद्र सरकारच्या रेल विकास निगम लिमिटेडला देण्यात आला आहे. सध्या मार्गावरील माती परीक्षणाचे काम सुरू आहे. या कामाची मुदत १३० आठवडे आहे. मुदतीत काम पूर्ण झाले तरच तीन वर्षांनी निगडीपर्यंत मेट्रो धावेल.

पहिल्या टप्प्यात पिंपरीतील महापालिका भवनापर्यंत मेट्रो सुरू झाली आहे. निगडीपर्यंत मेट्रो सुरू करण्याची शहरवासीयांची मागणी होती. त्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्याची दखल घेत केंद्र शासनाने या विस्तारीत मार्गाच्या ९१० कोटी १८ लाख खर्चाच्या कामास २३ ऑक्टोबर २०२३ रोजी अंतिम मान्यता दिली. त्यानुसार निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाण पुलापर्यंतच्या ५.५१९ किलोमीटर अंतराच्या ‘व्हायडक्ट’ कामाची निविदा काढण्यात आली. हे ३३९ कोटी खर्चाचे काम केंद्राच्या रेल विकास निगम लिमिटेडला मिळाले आहे. हा मार्ग उन्नत असून, तो निगडीहून पिंपरीच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्याने उभारला जाणार आहे.

हेही वाचा – लिपिकाकडून ४५ लाखांचा अपहार… कुठे घडला प्रकार?

या कामासाठी निगडी, भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक, टिळक चौक आदी ठिकाणच्या सेवा रस्त्यावर सुरक्षा कठडे लावून माती परीक्षण करण्यात येत आहे. माती परीक्षण झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. या कामाची मुदत १३० आठवडे आहे. हे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर लोहमार्ग टाकणे, सिग्नल व्यवस्था, विद्युतपुरवठा, स्थानक उभारणी आदी कामांची स्वतंत्रपणे निविदा काढली जाणार आहे. तीन वर्षे तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर निगडीपासून थेट स्वारगेट, रामवाडी आणि वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा – अल्पवयीन मुलाबरोबर पार्टीत सामील झालेल्या १५ जणांची चौकशी; कल्याणीनगर अपघात प्रकरणात सखोल तपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माती परीक्षणाचे काम सुरू आहे. त्यानंतर पुढील काम केले जाईल. काम मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले. तर, शहराचे प्रवेशद्वार असलेल्या निगडीपर्यंत पहिल्या टप्प्यातच मेट्रो धावणे आवश्यक होते. आता महामेट्रोने वेगात आणि वेळेत काम पूर्ण करावे. जेणेकरून नागरिकांना निगडीतून पुण्यापर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल, असे निगडीचे माजी नगरसेवक अमित गावडे म्हणाले.