लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील ३८८ जागांसाठी झालेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल रखडला आहे. यूपीएससीच्या परीक्षेमुळे पालिकेची परीक्षा देता न आलेल्या ८३ जणांची परीक्षा पुढील महिन्यात घेण्यात येणार आहे. या ८३ जणांमुळे ५५ हजार परीक्षार्थींचा निकाल प्रतीक्षेत आहे.
महापालिकेच्या विविध विभागांतील ३८८ जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा पार पडली. टाटा कन्सलटन्सी सर्विसेसच्या (टीसीएस) माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली. सरळ सेवेने भरती असल्याने राज्यभरातून अर्ज आले. या परीक्षेसाठी ८५ हजार ३८७ जणांनी अर्ज केले होते. मात्र, प्रत्यक्षात ५५ हजार जणांनी परीक्षा दिली. महापालिकेच्या परीक्षा कालावधीमध्ये यूपीएससीची परीक्षा आली होती. त्यामुळे ८३ जणांची परीक्षा घेणे शक्य झाले नाही. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच घेतली जाईल, असे पालिकेकडून सांगितले जाते. मात्र, परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीने प्रश्नपत्रिका तयार करण्यास दीड ते पावणे दोन महिने लागतील, असे सांगितले. त्यामुळे ८३ जणांची परीक्षा लांबणीवर गेली. ८३ जणांमुळे ५५ हजार परीक्षार्थींचा निकाल लांबणीवर गेला आहे. त्यामुळे महापालिकेने टीसीएस कंपनीशी बोलणी करून तत्काळ ८३ विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावा, अशी मागणी परीक्षार्थींकडून करण्यात येत आहे.
आणखी वाचा-पिंपरी: वैष्णवांच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज
उर्वरित ८३ जणांची परीक्षा त्वरित घेण्यासाठी टीसीएस कंपनीला सांगितले आहे. त्यानुसार जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्यासंदर्भात तयारी दाखविली आहे. परीक्षा होताच त्वरित निकाल जाहीर केला जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.