पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणून वर्चस्व सिद्ध करण्यासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, भाजपच्या विधान परिषद आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे; तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आमदार खापरे आणि गोरखे यांचे कार्यक्षेत्र पिंपरी मतदारसंघ आहे. मागीलवेळी १३ नगरसेवकांसह पिंपरीवर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. आता हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार बनसोडे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. चिंचवड, भोसरीच्या तुलनेत अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव असलेला पिंपरी विधानसभा मतदारसंघ लहान आहे. पिंपरीत सात प्रभाग येत असून २८ नगरसेवक निवडून येतात. २०१७ च्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १३ नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले होते. प्रभाग क्रमांक १९ विजयनगर, आनंदनगर, गावडे पार्क, भीमनगर, भाटनगर या प्रभागातून भाजपचे चारही नगरसेवक विजयी झाले होते. तर एकत्रित शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले होते. २०१४ चा अपवाद वगळता पिंपरीवर निर्मितीपासून बनसोडे यांचे प्रभुत्व असून ते तिसऱ्यांदा येथून निवडून आले. पिंपरीतून विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे विधान परिषद आमदार गोरखे यांचे कार्यक्षेत्रही पिंपरीच आहे. भाजपच्या विधान परिषदेच्याच आमदार खापरे यांचेही कार्यक्षेत्र पिंपरीच आहे. पक्षाने विधान परिषदेवर संधी दिल्याने पिंपरीतून भाजपचे जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान या दोघांवर असणार आहे. उपाध्यक्षपद मिळालेल्या बनसोडे यांना वर्चस्व सिद्ध करावे लागणार आहे. विधान परिषदेवर संधी मिळावी. यासाठी आग्रही असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचीही पिंपरीत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

प्रभाग क्रमांक दहा मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगरमधून आमदार गोरखे यांच्या मातोश्री अनुराधा गोरखे, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम, भाजपचे माजी उपमहापौर तुषार हिंगे, केशव घोळवे हे निवडून आले होते. यावेळी गोरखे यांच्या मातोश्री किंवा पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कदम या स्वत: लढणार की चिरंजीवाला मैदानात उतरविणार, यावर प्रभागातील लढती ठरतील. प्रभाग क्रमांक १४ चिंचवड स्टेशन, मोहननगर, रामनगर आणि प्रभाग क्रमांक १९ आनंदनगर, गावडे पार्क, भीमनगर, भाटनगर या दोन्ही प्रभागांतून आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ यांची निवडणूक लढविण्याची चाचपणी सुरू आहे. प्रभाग क्रमांक १९ मधून भाजप आमदार खापरे यांचा मुलगा जयदीप यांचीही चाचपणी सुरू आहे. दोन्ही आमदारांची मुले या प्रभागातून इच्छुक असल्याने उमेदवारीसाठी कोणाचा पत्ता कट होतो, त्यावरून येथील लढती ठरतील.

प्रभाग क्रमांक १५ आकुर्डी गावठाण, निगडी प्राधिकरणातून तत्कालीन राष्ट्रवादीचे राजू मिसाळ, तत्कालीन शिवसेनेकडून अमित गावडे आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या मातोश्री शैलजा मोरे, शर्मिला बाबर भाजपकडून निवडून आल्या होत्या. त्यापैकी मिसाळ संभ्रमावस्थेत असून गावडे पक्षांतराच्या तयारीत आहेत. मोरे स्वत: लढणार की पुन्हा मातोश्रीलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवितात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रभाग क्रमांक २० संत तुकारामनगर, वल्लभनगर प्रभागातून तत्कालीन राष्ट्रवादीकडून योगेश बहल, श्याम लांडे, सुलक्षणा धर आणि भाजपकडून सुजाता पालांडे निवडून आल्या होत्या. बहल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष असून, धर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात आहेत. पालांडे या भाजपच्या महिला शहराध्यक्षा आहेत. त्यामुळे उमेदवारांबाबत उत्सुकता असणार आहे.

प्रभाग क्रमांक २१ पिंपरीगावमधून तत्कालीन राष्ट्रवादीकडून उषा वाघेरे, निकिता कदम, डब्बू आसवाणी आणि भाजपकडून संदीप वाघेरे निवडून आले होते. उषा यांचे पती संजोग वाघेरे हे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख आहेत. त्या कोणत्या पक्षाकडून लढतील, यावर येथील लढती ठरतील.
प्रभाग क्रमांक ३० दापोडीतील तीन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असून भाजपच्या आशा शेंडगे तटस्थ भूमिकेत आहेत. येथून रिपाइंच्या (आठवले गट) चंद्रकांता सोनकांबळे याही निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत.

प्रभाग क्रमांक – प्रभागाचे नाव

प्रभाग क्रमांक – प्रभागाचे नाव

१० – मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर

१४ – चिंचवड स्टेशन, मोहननगर

१५ – आकुर्डी, निगडी प्राधिकरण

१९ – आनंदनगर, गावडे पार्क

२० – संत तुकारामनगर, वल्लभनगर

२१ – पिंपरीगाव

३० – दापोडी